भोजनानंतर त्वरित ही कामे करणे टाळा


उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार ह्यांची गरज असतेच, पण त्या जोडीला या दोहोंशी निगडीत काही नियमांचे पालन करणे ही गरजेचे असते. हे नियम फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आले आहेत. उदाहरणार्थ भोजनानंतर शतपावली घातल्याने अन्न व्यवस्थित पचण्यास मदत तर होतेच, पण त्याशिवाय जेवण झाल्यानंतर शरीरामध्ये जी सुस्ती किंवा शिथिलता येते, ती न येता, शरीरामध्ये उत्साह टिकून राहतो. या आणि अशाच अनेक पद्धती आपल्याकडे मानल्या जातात. ज्या प्रमाणे भोजनानंतर काय करावे याबद्दल काही रीती आपल्याकडे आहेत, त्याचप्रमाणे काय करू नये या बद्दलही विचार करणे अगत्याचे आहे.

काही व्यक्तींना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. पण वजन वाढेल या भीतीने गोड पदार्थ खाण्याऐवजी ह्या व्यक्ती भोजनानंतर फळे खाऊन आपली गोड खणायची इच्छा पूर्ण करून घेतात. पण भोजनानंतर फळांचे सेवन शक्यतो करू नये. याचे कारण असे, की फळांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे फायबर पोटातील अन्नामध्ये मिसळल्याने अन्नाचे पचन लवकर होत नही. त्यामुळे नंतर पोटात दुखणे, गॅसेस होणे असल्या तक्रारी उद्भवू शकतात. जर फळे खायची असतील तर ती जेवणापूर्वी काही काळ आधी खावीत किंवा जेवणानंतर तासाभराने खावीत.

जेवणानंतर त्वरित धूम्रपान करण्याची सवय अपायकारक ठरू शकते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. तसेच काही व्यक्तींना जेवल्यानंतर लगेचच दात घासण्याची सवय असते. असे केल्याने दातावरील इनॅमल खराब होऊन दातांना अपाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवल्यानंतर अन्नाचे अंश तोंडातून काढून टाकण्यासाठी स्वच्छ चुळा भरून टाकाव्यात आणि अर्ध्या तासाने दात घासावेत. पुष्कळ लोकांना जेवणानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते. पण चहामधील टॅनिन मुळे आपण सेवन केलेल्या अन्नामधील प्रथिने आणि लोह ही तत्वे शरीरामध्ये व्यवस्थित शोषली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच चहा घेणे शक्यतो टाळावे.

दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाले की सुस्ती आल्यामुळे काही व्यक्ती लगेच बिछान्यावर आडव्या होतात. पण हे करणे प्रयत्नपूर्वक टाळायला हवे. भोजनानंतर आपण जितके अधिक क्रियाशील राहू, तितके आपल्या पोटातील अन्नाचे पचन व्यवस्थित, विनातक्रार होईल. पण जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने पचन कार्य शिथिल होते आणि मग पचनाशी संबंधित तक्रारी सुरु होतात.

भोजनानंतर त्वरित स्नान करण्याचे ही अगत्याने टाळावे. जेवण झाल्यानंतर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह अन्नाच्या पचनासाठी पोटातील अवयवांकडे वळविला जातो. मात्र आंघोळ केल्याने हा रक्तप्रवाह हातापायांच्या दिशेने वळविला जाऊन, शरीराचे तापमान ही काही काळाकरिता कमी होऊन जाते. त्या मुळे पोटातील अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जेवण झाल्यानंतर त्वरित गाडी चालविण्याचेही टाळावे. जेवण झाल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह पोटाकडे वळविला जात असल्याने मेंदूला काहीश्या कमी प्रमाणात रक्त पुरवठा होतो. याचमुळे जेवण झाल्यानंतर त्वरित शरीरामध्ये शैथिल्य जाणवून झोप येत असल्याची भावना होते. म्हणून जेवणानंतर त्वरित गाडी चालविणे शक्यतो टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment