उपराष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंटवर पुन्हा झळकली ब्लू टिक


नवी दिल्ली – देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक शनिवारी अचानक गायब झाली होती. पण ही कारवाई ट्विटरनेच केली होती, ज्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. ट्विटरच्या या कारवाईवरून चर्चेच्या फेऱ्या झडायला लागलेल्या असतानाच ट्विटरने त्यांच्या खात्यावरील ब्लू टिक पुन्हा बहाल केली आहे. या प्रकाराबाबत ट्विटरने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जुलै 2020 पासून ट्विटर अकाऊंट वापरात नसेल, तर ते अकाऊंट आपोआप इनअॅक्टीव्ह होते आणि त्यावरील ब्लू टिक गायब होते, असे ट्विटरने म्हटले आहे.

ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचे नाव बदलले गेले असेल किंवा एखादं अकाऊंट सक्रिय नसेल वा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केले जाते आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. दुसरी गोष्टी म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल पण नंतर त्याने कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील, तर ब्लू टिक हटवली जाते. उपराष्ट्रपती झाल्यापासून व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतींच्या हॅण्डलचाच वापर करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलचा वापर होत नसल्यामुळे ब्लू टिक काढून टाकण्यात आली असावी, असे सांगितले जात आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यामुळे सरकारने आणि भाजपने नाराजी व्यक्त केली. या कृतीबद्दल माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी ट्विटरवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. त्यानंतर ट्विटरने आपली चूक दुरुस्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. तर ट्विटरने केवळ व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरीलच ब्लू टिक काढलेली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या खात्यावरील ब्लू टिक काढून टाकली असल्याचे संघाचे राजीव तुली यांनी म्हटले आहे.