येत्या 2-3 दिवसांत महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता


मुंबई – काल केरळामध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर उद्यापर्यंत केरळच्या उर्वरित भाग मॉन्सून व्यापेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्याचबरोबर लक्षद्वीप, तामिळनाडू, पुडुचेरी, दक्षिण कर्नाटकपर्यंत पोहण्याची शक्यता आहे. मॉन्सून आज अजून पुढे सरकला असून मॉन्सून दाखल होण्यासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मॉन्सून पुढील 2-3 दिवसांत मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये आणि महाराष्ट्र, गोव्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

यामुळे उन्हाने त्रासलेल्या राज्यातील सर्व नागरिकांना, बळीराजाला आनंदवार्ता मिळाली आहे. दरम्यान, 1 जून रोजी केरळमध्ये मॉन्सून दाखल होईल असा अंदाज होता. पण त्यास काहीसा विलंब झाला, असला तरी काल मॉन्सूनने केरळमध्ये हजेरी लावली आहे आणि आता उर्वरित देश मॉन्सूनच्या प्रतिक्षेत आहे. त्याचबरोबर पुढचे 2-3 दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

केरळमध्ये गुरुवारी मॉन्सून दाखल झाला आणि देशात पावसाळ्याची सुरुवात झाली, याची माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली. केरळमध्ये मॉन्सून दाखल होताच काही भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. केरळमधील पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, कोझीकोड, कन्नूर आणि कासरगोड या 8 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.