मोदी सरकारची निराशा; मेहुल चोक्सीच्या घर वापसीसाठी गेलेले अधिकारी रिकाम्या हाती परतले


नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेला चूना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सीच्या घर वापसीच्या हेतूने डोमिनिकाला गेलेले भारतीय अधिकाऱ्यांचे पथक मायदेशी परतले आहे. मेहुल चोक्सीला देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिकामध्ये अटक करण्यात आल्यामुळे मेहुल चोक्सीचे डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावे यासाठी प्रयत्न सुरु असून अधिकाऱ्यांचे एक पथक डोमिनिकात दाखल झाले होते. पण इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल चोक्सीशिवाय हे पथक मायदेशी परतले आहे.

भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक २८ मे रोजी डोमिनिकात मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यास त्याला आणण्यासाठी दाखल झाले होते. यामध्ये सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. किमान अजून महिनाभर तरी मेहुल चोक्सीला डोमिनिकातच राहावे लागणार आहे. त्याला सध्या पोलिसांच्या सुरक्षेत रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

सध्या मेहुल चोक्सी अटकेत असून दोन वेगवेगळ्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

न्यायालयात मेहुल चोक्सी याने एक याचिका केली असून पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर होती का? तसेच त्याला कोणत्या देशात परत पाठवले जावे, यावर सुनावणी सुरु आहे. तर दुसऱ्या प्रकरणात मेहुल चोक्सीने बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. या दोन प्रकरणांचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचे भारतात प्रत्यार्पण होणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.