शासकीय कार्यालयात शिवराज्यभिषेक दिनी भगवा ध्वज उभारण्यास गुणरत्न सदावर्तेंचा विरोध


मुंबई : रविवारी असलेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या मुद्द्यावरून एक नवा वाद समोर आला आहे. शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाने त्यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये हा सोहळा साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. भगवा ध्वज असलेली गुढी यादिवशी उभारली जाणार आहे. पण त्याला वकील गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केला असल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

6 जून रोजी संपूर्ण राज्यात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत त्यासाठी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. यासाठी एक विशेष ध्वजही तयार करण्यात येत आहे. शिवशक, राजदंड आणि स्वराज्याची गुढी उभी करण्यात येणार आहे. गुढीला भगवा स्वराज्य ध्वजसंहिता लावण्यात येणार आहे.

हा ध्वज कसा असावा हे ठरवून देण्यात आले आहे. ध्वज तीन फूट रुंद, सहा फूट लांब असेल. भगव्या रंगाच्या ध्वजाला सोनेरी किनार असेल. ध्वजावर जिरेटोप, सुवर्ण होण, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे अशी शिवरायांची पाच शुभचिन्हे असतील. किमान 15 फूट उंच बांबूवर ही गुढी उभारण्याचे निर्देश आहेत.

दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या या आदेशाला विरोध दर्शवला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये तिरंग्याच्या व्यतिरिक्त कोणताही ध्वज लावण्यास परवानगी नसते. हा प्रकार देशाच्या एकसंधतेचा अवमान करण्याचा आणि संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा आदेश रद्द करावा आणि तो काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तशीच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे. हा प्रकार म्हणजे देशद्रोह असून जर हा आदेश मागे घेतला नाही, तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्याचा इशारादेखील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.

सदावर्ते यांनी हा प्रकार म्हणजे देशद्रोही कृत्य असल्याची टीका केली आहे. मराठा आरक्षणाला देखील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला होता. तसेच मराठा नेत्यांवर या मुद्द्यावरून टीका देखील केली होता. या प्रकरणी देखील मराठा समाजाला खूश करण्यासाठी सरकार हे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे यावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.