अनलॉकच्या गोंधळावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया


रायगड – अनलॉक संदर्भातील घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर झालेल्या निर्माण झालेल्या गोंधळावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली आणि गुरुवारी एकच गोंधळ उडाल्यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असे चित्र निर्माण झाले होते. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले. दरम्यान या सर्व गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

सरकारमध्ये अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद असून जेव्हापासून राज्यात कोरोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर मग अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवार यांनी एक शब्द राहून गेला होता, त्यामुळे गैरसमज झाला होता, असे स्पष्ट केले आहे. शेवटी सरकार कोणाचेही असले तरी राज्याचे मुख्यमंत्री सांगतील, तो अंतिम निर्णय असतो, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाऊन काढण्याचा प्रस्ताव असून त्यास आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो, असे स्पष्टीकरण दिले होते.

त्यानंतर ते पुन्हा शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे अंतिम प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल. फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांची विरोधक म्हणून भूमिका योग्य असून त्यांना ती मांडावीच लागते. पण यामध्ये श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. सरकार म्हणून जे काही करावे लागते ते आम्ही करत असतो.