अजित पवारांचे पोलिसांना प्रीवेडिंग शूटसाठी कोकणात येणाऱ्यांना त्रास न देण्याचे आवाहन


रायगड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीवेडिंग शूटसाठी येणाऱ्यांना अडवू नका. ते हनिमूनसाठी पण येथेच आले पाहिजेत, असे सांगत पोलिसांनी दांपत्यांना चांगली वागणूक देण्याचा सल्ला दिला आहे. रायगड-श्रीवर्धन दौऱ्यावर अजित पवार असून यावेळी कार्यक्रमातील भाषणादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी शरद पवारांनी अनेक वादळे पाहिली असून कोकणाचा कॅलिफोर्निया करावा, ही त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले.

सध्याच्या काळात लग्न ठरले की प्रीवेडिंग शूटचा ट्रेंड सुरु आहे. यासाठी अनेक मुले मुली श्रीवर्धनमध्ये येतात. शूटिंगसाठी येणाऱ्या या मुलांमध्ये वाद झाल्याचे ऐकायला येते. त्यांना येथे रोखले जाते. मग पोलीस ठाण्यापर्यंत ही प्रकरणे जातात. पण तसे करु नका. प्रीवेडिंगला आलेल्या जोडप्याला एवढी चांगली वागणूक द्या की नंतर त्यांनी हनिमूनलाही येथेच आले पाहिजे. हनिमून झाल्यावर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाही येथेच आले पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य, संरक्षण द्यायला हवे. यामुळे उत्पन्नाचे साधन तयार होईल, असे अजित पवार म्हणाले.

शरद पवारांनाही कोकणाबद्दल आत्मियता आहे. त्यांचे या भूमिवर खूप प्रेम आहे. त्यांची या परिसराचा कॅलिफोर्निया करण्याची इच्छा आहे. शरद पवारांच्या दूरच्या दृष्टीने मधु दंडवतेंची मदत घेऊन कोकण रेल्वे आली. त्यावेळी शरद पवारांनी पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीने निधी देण्याचे काम केले, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले. अनेक हल्ले, वादळे, दुष्काळ, गारपीट शरद पवारांनी पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभे करण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.

येथे आमचीच मुलगी आमदार असून बापाच्या नात्याने तिला पैसे कमी पडू देणार नाही. तुम्ही काळजी करु नका. आम्हा सर्वांचे लक्ष असून लागेल ती मदत करु. अदिती चांगले काम करत आहे. ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, असा मिश्किल चिमटा अजित पवार यांनी यावेळी काढला. त्याचबरोबर दिलेला पैसा घेतलेल्या कामासाठीच खर्च झाला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. ब्रिटिशांचे काम टिकते मग आपले का टिकत नाही, अशी समजही यावेळी अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.