‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत विवाह बंधनात अडकली अभिनेत्री यामी गौतम


बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हि गुपचूप विवाहबद्ध झाली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. आदित्य धरसोबत यामी गौतमने लग्न केले आहे. यामी गौतम अभिनित ‘उरी’ या चित्रपटाचा आदित्य धर दिग्दर्शक आहे. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर विक्की कौशलदेखील मुख्य भूमिकेत दिसला होता.

बर्‍याच छोट्या-मोठ्या कलाकारांनी कोरोना काळात लग्न उरकली होती. ज्यात आता यामी गौतमच्या नावाचाही समावेश झाला आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याने देखील यापूर्वी जानेवारी महिन्यात आपली बाल मैत्रीण नताशा दलाल हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर आता यामी गौतमने देखील लग्न केले आहे. या वधू वेशामध्ये यामी खूपच सुंदर दिसत आहे. यामीचे चाहते देखील तिच्या या सोशल मीडिया पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.


आपल्या पोस्टची सुरूवात यामीने पर्शियन कवी रुमी यांनी लिहिलेल्या कविताने केली आहे, तिने लिहिले आहे की, तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले. आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाने, आज आम्ही लग्न केले आहे, हा एक अगदी घरगुती सोहळा होता. खूप कमी लोक उपस्थित असल्यामुळे आम्ही हा आनंदी सोहळा आमच्या कुटुंबासमवेत साजरा केला.

‘उरी’ या चित्रपटापासून यामी गौतम आणि आदित्य धर हे एकमेकांना ओळखतात. आदित्य एक उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. यामी गौतम आणि आदित्यच्या लग्नाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.