मुंबई – लसीकरण केंद्रांवर लावले गेलेले राजकीय बॅनर्स व होर्डिंग्ज काढण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेकडे लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीबाबत अनेक तक्रारी येत असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी जाहिरातबाजी रोखण्याची तंबी दिली आहे. अशा प्रकारच्या अनुचित जाहिराती करणे हे वस्तुस्थिती व सौजन्याला धरून योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या या वर्तनाचा समाचार घेतला आहे.
मुंबई मनपा आयुक्तांनी दिले लसीकरण केंद्रांवरील राजकीय बॅनर्स काढण्याचे आदेश
जर नगरसेवक, आमदार, खासदार किंवा अन्य कुणाकडून लसीकरण केंद्रांवर लावण्यात आलेल्या जाहिराती, बॅनर्स किंवा होर्डिंग्ज विनंती करूनही उतरवले जात नसतील, तर ते काढले जावेत, असे मनपा आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. तसेच, मुंबई मनपाकडे अशा बॅनर्स व होर्डिंग्ज संदर्भात अनेक तक्रारी येत असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम त्यातील प्रचाराचा भाग होऊ लागला आहे. महानगरपालिकेने मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. या लसीकरण केंद्रांच्या बाहेर लसीकरण सुरू आहे कि वा नाही या फलकापेक्षाही आधी एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा फलक नजरेस पडतो.