Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट बनावट असून त्याचा सरकारशी कोणताही संबंध नाही


मुंबई : शिक्षक भरतीसाठी जर तुम्ही देखील अर्ज करणार असाल तर वेळीच सावध व्हा. कारण शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सतर्क करणारी माहिती समोर आली आहे. जर तुम्ही शिक्षक किंवा इतर पदांच्या भरतीसाठी shikshaaabhiyan.org या वेबसाईटवरुन अर्ज केला असेल, तर यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट बनावट असून त्याचा सरकारशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा राज्य सरकारकडून करण्यात आल्यामुळे या वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहनही सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर यासंदर्भात मुंबईतील मरिन लाईन्स पोलीस स्थानकात राज्य सरकारने तक्रारही दाखल केली आहे.

Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. यासंदर्भातील अनेक मेसेज सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होते. या वेबसाईटवर वेगवेगळ्या पदांसाठी म्हणजेच, सर्व शिक्षा अभियान भरती 2021 या मथळ्याखाळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी, त्याचप्रमाणे यासंदर्भातील शिक्षक भरतीमधील इतर पदांसाठी जाहीरात देण्यात आली होती.

तसेच अनेक शिक्षकांनी या वेबसाईटवर अर्ज केले असून या वेबसाईटच्या माध्यमातून यासंदर्भात भरती केली जात असल्याचे समोर आले होते. तसेच यासंदर्भात शिक्षण विभागाला सर्व माहिती मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या वतीने खुलासा करण्यात आला आहे.

Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट आणि राज्य सरकारचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचा खुलासा शिक्षण विभागाच्या वतीने अधिकृतपणे करण्यात आला. ही वेबसाईट बनावट आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती सध्या सुरु नसल्याचेही शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच जे उमेदवार नोकरीसाठी इच्छुक आहेत, त्यांनीदेखील या वेबसाईटवर अर्ज करु नये, असे आवाहनही शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना करुन सतर्क करण्यात आले आहे.