कोरोना, चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटे मोदी सरकारने शरियतमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे आली


लखनौ – कोरोना प्रादुर्भाव आणि देशांच्या दोन्ही किनारपट्ट्यांना धडकलेल्या चक्रीवादळांसंदर्भात एक विचित्र वक्तव्य उत्तर प्रदेशमधील मुरादाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी केले आहे. केंद्रातील मोदी सरकार कोरोना आणि चक्रीवादळांसाठी जबाबदार असल्याचे हसन यांनी म्हटले आहे. शरियत कायद्यामध्ये मोदी सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे कोरोना आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्ती देशामध्ये आल्याचे वक्तव्य हसन यांनी केले आहे.

सीएए आणि एनआरसी कायद्यांच्या माध्यमातून मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप हसन यांनी केला आहे. मोदी सरकारने मागील सात वर्षांमध्ये केवळ धार्मिक भेदभाव निर्माण करण्यासंदर्भातील कायदे बनवले. सरकारच्या या भेदभावामुळेच महासाथ आणि दोनदा वादळे येऊन गेली आहेत. जमीनीवरील लोकांना न्याय दिला नाही तर देव, ईश्वरी शक्ती न्याय करतो, असेही हसन यांनी म्हटल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.

देशातील ९९ टक्के लोक धार्मिक असून जग चालवणारा आणि जगामध्ये न्याय देणारा कोणीतरी वर असल्याचे आपल्यापैकी सर्वजण मानतात. तो जेव्हा आकाशातील न्याय करतो, तेव्हा त्यात जर तरची शक्यता नसते. मागील काही दिवसांमध्ये किती मृतदेहांची कशापद्धतीने हाताळणी करण्यात आली, त्यांना मृत्यूनंतरचा सन्मान नाकारण्यात आला हे आपण पाहिले असेल. मृतदेह नदीत सोडण्यात आले. कुत्र्यांनाही मृतदेहांचे लचके तोडले. स्मशानांमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडेही उपलब्ध नसल्याचे हसन यांनी म्हटले आहे.

गरीब जनतेची या सरकारला चिंता नाही. सर्व वाटा केवळ श्रीमंतांचा आहे, असा टोलाही हसन यांनी लगावला. श्रीमंतांना ज्याने जन्म दिला आहे त्यानेच गरीबांना देखील जन्म दिला आहे. तो सर्वांचा मालक आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता माझ्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात आणखीन नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल, अशी भीतीही हसन यांनी बोलून दाखवली आहे.