
मुंबई : पत्रकार परिषद घेत अनलॉकचे पाच टप्पे राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. पण आता महाविकास आघाडी सरकारने आपल्या निर्णयावरून तासाभरातच यू टर्न घेतला आहे. आता राज्य सरकारने या संदर्भात स्पष्टीकरण देत राज्यातील निर्बंध हटवण्यात आले नसून, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे म्हटले आहे.
Unlock वरून अवघ्या तासाभरात महाराष्ट्र सरकारचा यू टर्न
आपण अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागातील काही ठिकाणी अजूनही प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे.
यापुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. या निकषांच्या आधारे राज्यात निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.
अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल, तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.
