२ ते १८ वयोगटातील मुलांवर पाटणा एम्समध्ये कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरु


पाटणा – केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पावले उचलायला सुरवात केली आहे. लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट धोकादायक ठरू शकते. तसेच मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण देखील अधिक असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर चाचणी करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार २ ते १८ वयोगटातील मुलांवर देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर लसीची चाचणी सुरु करण्यात आली आहे. देशातील एकूण ५२५ मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीसाठी मुलांचे वय किमान २ वर्षे असायला हवे असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी पाटणा एम्समध्ये लहान मुलांवर चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे.

पाटण्यातील एम्समध्ये २ जूनला तीन मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला. कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी एकूण १५ मुले आली होती. त्यापैकी ३ मुलांची निवड करण्यात आली होती. तत्पूर्वी मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. त्यात ३ मुले चाचणी करण्यासाठी योग्य असल्यामुळे त्यांना लसीचा पहिला डोस दिला गेला.

या मुलांना लस दिल्यानंतर जवळपास दोन तास देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. या मुलांना आता २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. कोव्हॅक्सिन लसीची चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जात आहे.

केंद्र सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्था वाढविण्याबरोबर परिणामकारक उपचार देण्यासाठी डॉक्टरांच्या प्रशिक्षणावरही भर देत आहे. या लाटेत प्रामुख्याने लहान मुले मोठ्या प्रमाणात असतील, ही तज्ज्ञांची माहिती लक्षात घेऊन लहान मुलांवरील कोरोना उपचाराला प्राधान्य देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणे, लहान मुलांची वेगळी व्यवस्था करताना त्यांच्यावरील उपचाराला विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. लहान मुलांसोबत आई असणे आवश्यक असल्यामुळे बेड व उपचाराची रचना करताना वेगळी व्यवस्था करावी लागेल.