मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी; तर एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची MMRDA महानगर आयुक्तपदी नियुक्ती


मुंबई – मिलिंद म्हैसकर यांची राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी, तर एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली आहे. एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती आर. ए. राजीव यांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे त्यांच्या जागी करण्यात आली आहे. तूर्तास अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला होता.

या पदावर एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती झाल्यानंतर सोनिया सेठी यांना त्यांच्याकडे पदाभार सोपवण्यास सांगितले आहे. एस. व्ही. आर श्रीनिवास हे १९९१च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्यामुळे ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. अखेर त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली. तर एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांची वर्णी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेले मिलिंद म्हैसकर हे १९९२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. महसूल आणि वन विभागतही प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.

२८ फेब्रुवारीला आर. ए. राजीव हे निवृत्त झाले होते. त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केल्यामुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांच्याच नेतृत्वात मुंबईत सुरु असलेल्या ३३७ किमी मेट्रो मार्गाचे काम सुरु होते.