ब्रेकिंग न्यूज! राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द


मुंबई – आज राज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ही माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले होते. पण त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत.

आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे. आता आपत्ती व्यवस्थापन विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमची पहिल्यापासूनच परीक्षा रद्द करण्याची भूमिका असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.