केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची वैधता अमर्यादित कालावधीसाठी वाढवली


नवी दिल्ली – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या इच्छुकांना मोठा दिलासा दिला आहे. कारण शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate) वैधता आता अमर्याद कालावधीसाठी वाढवण्यात आल्यामुळे शिक्षकी पेशा निवडण्याऱ्या इच्छुकांना फायदा होणार आहे. या प्रमाणपत्राची वैधता यापूर्वी ७ वर्षांसाठी होती. या कालावधीत शिक्षकाची नोकरी लागली नाही, तर इच्छुकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे हा निर्णय बदलत प्रमाणपत्राची वैधता अमर्याद कालावधीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वाढवली आहे. ही घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे.

हा नियम पूर्वलक्षी प्रभावासह २०११ या वर्षांपासून लागू होणार असल्यामुळे शिक्षक भरतीसाठी २०११पासूनचे उमेदवार ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले आहे.

या निर्णयाचा फायदा शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी आणि करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. ज्या उमेदवाराचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र २०११ या वर्षानंतर बाद झाले आहे. अशा सर्व उमेदवारांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत.