करोनाने चलनी नोटांचीही लावली वाट

करोनाने केवळ माणसांचीच नाही तर चलनी नोटांची सुद्धा वाट लावली आहे. करोनाच्या भीतीने लोकांनी नोटा सॅनीटाइज करणे, धुणे, वाळविणे, इस्त्री करणे असे अनेक प्रकार केल्याने मोठ्या प्रमाणावर चलनी नोटा खराब झाल्या आणि त्या चलनातून काढून टाकाव्या लागल्याचे रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले आहे. रिझर्व बँकेच्या म्हणण्यानुसार करोना काळात जितक्या नोटा खराब झाल्या तितक्या प्रमाणात या पूर्वी कधीच नोटा खराब झाल्या नव्हत्या.

आकडेवारी सांगते २०१८-१९ मध्ये दोन हजार मूल्याच्या ६ लाख नोटा नष्ट झाल्या तर २०२०-२१ मध्ये ४५.४८ कोटी नोटा नष्ट झाल्या आहेत. २०१८-१९ मध्ये २०० रुपये मूल्याच्या १ लाख नोटा अत्यंत खराब अवस्थेत होत्या ,२०२०-२१ मध्ये ही संख्या ११.८६ कोटींवर गेली आहे. ५०० रुपयाच्या खराब नोटामध्ये ४० टक्के वाढ झाली आहे.

२०१९-२० च्या तुलनेत दोन हजार रुपये मूल्याच्या अडीचपट, ५०० व २०० रुपये मूल्याच्या साडेतीन पट नोटा खराब झाल्या. त्यामानाने कमी मूल्यांच्या नोटांवर करोनाचा प्रभाव पडला नाही. याचे एक कारण असे की नागरिकांनी जादा मूल्याच्या नोटा धुतल्या, सॅनीटाइज केल्या आणि साठवल्या. त्यांना हवा न लागल्याने त्या फाटल्या. उलट कमी मूल्याच्या नोटा सतत वापरत राहिल्याने त्यांना हवा लागली आणि त्या कमी खराब झाल्या.