दिलासादायक; राज्याचा रिकव्हरी रेट 94.54 टक्क्यांवर


मुंबई – राज्यात आज 15,169 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज 29,270 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर आज 285 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट आहे. राज्यात आज एकूण 2,16,016 सक्रिया रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 54,60,589 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.54% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 285 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16,87,643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान मुंबईत दिवसभरात 925 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,74,296 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16580 एवढी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे.

त्याचबरोबर आज पुणे शहरात 384 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 858 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 4 लाख 70 हजार 311 झाली आहे तर कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 4 लाख 56 हजार 509 झाली आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 हजारांच्या खाली असून शहरात 5 हजार 518 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मंगळवारी पुण्यात 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट आता 97 टक्के झाला आहे. तर पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा काल 6.44 टक्के एवढा नोंदवला आहे. पुणे मनपा हद्दीतील शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून उद्याही हे लसीकरण होणार आहे. उद्या विद्यार्थ्यांसाठी 300 डोस उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

आज राज्यातील 12 शहर (महापालिका क्षेत्र) आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद सरकारी आकडेवारीनुसार नाही. चंद्रपूर शहर, भंडारा जिल्हा, बुलडाणा, अमरावती शहर, नांदेड शहर, परभणी शहर, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, धुळे शहर, मीरा भायंदर, भिवंडी, ठाणे शहर या ठिकाणी एकाही मृत्यूची नोंद सरकारी आकडेवारीनुसार करण्यात आलेली नाही. तर पनवेल शहर, मालेगाव शहर, जळगाव शहर, औरंगाबाद जिल्हा, लातूर शहर, अकोला शहर, वाशिम जिल्हा, नागपूर शहर, नागपूर जिल्हा, चंद्रपूर शहर या ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद सरकारी आकडेवारीत केलेली आहे.