माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम; आता माहिती विभागाच्या फेसबुक पेजवर ‘कोविड अलर्ट’


मुंबई : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आता फेसबुकच्या सहकार्याने ‘कोविड अलर्ट’ या सुविधेच्या माध्यमातून राज्य शासन घेत असलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती राज्यातील जनतेला देत आहे.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आपल्या विविध समाज माध्यम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोविड या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती प्रसारित करीत असते. कोविड संदर्भातील माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता महासंचालनालयाने फेसबुक च्या सहकार्याने ‘कोविड अलर्ट’ या सुविधेचा वापर सुरू केला आहे.

या फेसबुक अलर्ट सुविधेमुळे कोविड संदर्भातील महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्रातील सर्व फेसबुक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचविणे सहज शक्य झाले आहे. 30 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. या संबोधनात महाराष्ट्रात 15 जून 21 पर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत. अशा आशयाचे अलर्ट फेसबुकवरुन देण्यात आले. या अलर्टसोबत शासनाचे आदेश जोडण्यात आले होते. फेसबुकवरील हे अलर्ट राज्यातील 1 कोटी 10 लाख फेसबुक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले गेले.

‘कोविड अलर्ट’ ही सुविधा फेसबुकने नुकतीच सुरू केली असून देशातील प्रत्येक राज्यात फक्त एका शासकीय यंत्रणेस ही सुविधा फेसबुक देत आहे. कोविड संदर्भातील अधिकृत माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि चुकीची माहिती प्रसारित होऊ नये यासाठी फेसबुक ने ही नवी सुविधा उपलब्ध केली आहे.

या सुविधेमुळे आता माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे फेसबुक पेज facebook.com/MahaDGIPR हे आता कोविड संदर्भातील महत्वाच्या घोषणा आणि निर्णयांची माहिती प्रसारित करणार आहे.