पाकिस्तानने तयार केली स्वदेशी ‘पाकवॅक’ करोना लस

पाकिस्तानने करोना साठी स्वदेशी लसीचे उत्पादन केल्याचे मंगळवारी एका कार्यक्रमात जाहीर केले गेले असून या लसीचे नामकरण ‘पाकवॅक’ असे केले गेले आहे. ही लस या कार्यक्रमात लाँच करण्यात आली. पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वास्थ्य सल्लागार डॉ. फैसल सुलतान यांनी ही लस लाँच केली. यापूर्वी पाकिस्तान चीन आणि रशिया कडून करोना लस खरेदी करत होता.

डॉ. फैसल यावेळी बोलताना म्हणाले, स्वदेशी करोना लसीची गरज आम्हाला जाणवत होती. ही लस आता तयार झाली आहे. काही दिवसातच मोठ्या प्रमाणावर या लसीचे उत्पादन सुरु होईल. लस निर्मिती करताना आमच्या संशोधकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण या काळात आमचा मित्र देश चीन आमच्यासोबत उभा होता. राष्ट्रीय आरोग्य संस्थेने चांगली कामगिरी बजावली. आज सर्व अडचणी पार करून स्वदेशी लस तयार करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. आजचा दिवस देशासाठी महत्वाचा आहे.

नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरचे प्रमुख असद उमर म्हणाले करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या संख्येने संक्रमित झाले असून ६० टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. या कार्यक्रमात उपस्थित असलेले चीनी राजदूत नोंग राँग म्हणाले पाकिस्तानच्या लस निर्मितीमुळे आमची दोस्ती किती मजबूत आहे हे दिसले आहे. चीनी लसीच्या भेटीचा स्वीकार करणारा पाकिस्तान हा पहिला देश होता.