शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे : संजय राऊत


मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे असून देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी या भेटीत मार्गदर्शन केले असेल, म्हटले आहे. मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

सोमवारी (31) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. स्वत: फडणवीस यांनी ट्वीट करत भेटीचा फोटो पोस्ट करत माहिती दिली. काल संपूर्ण दिवसभर महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटीची चर्चा रंगली होती. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळणार का? असेही म्हटले जात आहे.

संजय राऊत यांना या भेटीविषयी आज विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांची तब्येत किंचित बरी नाही, ही सदिच्छा भेट आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारणात शत्रूत्व घेऊन बसत नाही. एकमेकांकडे जाणे-येणे असते, एकमेकांशी चर्चा असते. त्यामुळे या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणे चुकीचे आहे.

विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला कोणत्या प्रकारचे सहकार्य करणे गरजेचे आहे या संदर्भात पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केले असावे. या राज्याला विरोधी पक्षांची मोठी परंपरा आहे. शरद पवारही विरोधी पक्षनेते होते. त्यांनी त्यावेळी उत्तम काम केले असल्यामुळे फडवणीसांनी जर त्यांची भेट घेतली, असेल तर त्यांना चांगले मार्गदर्शन केले असावे, असं संजय राऊत यांनी सांगितले.

सत्तेचा मंत्र शरद पवारांनी नक्कीच दिला असेल. ज्याप्रमाणे विरोधी पक्ष महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करत आहे, सरकारच्या कामात अडथळे निर्माण करतो, ते पाहता पुढील 100 वर्षात राज्यात विरोधी पक्षाचे सरकार येणार नाही, हे पवारांनी निश्चित सांगितले असेल, असा उपहासात्मक टोलाही राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा पवार आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर पुन्हा सुरु झाली. ऑपरेशन लोटस विसरुन जा. ऑपरेशन लोटस ना बंगालमध्ये ना महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. शरद पवार हे महाराष्ट्रासह देशातील मोठ नेते आहेत. त्यांची तब्येत काहीशी बरी नसल्यामुळे ही सदिच्छा भेट असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान आज राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांशी शरद पवार चर्चा करणार आहेत. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक होत असल्याची चर्चा रंगली आहे. यावर मी पवारांना पाच दिवसांपूर्वी भेटलो होतो. त्याआधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली होती. प्रत्येक भेटीचा असा राजकीय अर्थ काढू नये. राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक असेल, त्यांना पक्षाचे प्रमुख मार्गदर्शन करणार असतील त्यात राजकारण म्हणून कशाला पाहायचे? असे संजय राऊत म्हणाले.