संभाव्य पूर परिस्थितीत प्रशासनाने समन्वयाने व आघाडीवर राहून काम करावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील


सांगली : संभाव्य पूर परिस्थितीच्या काळात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याच्या महसूल व जलसंपदा विभागासह संबधित सर्वच विभागांनी सतर्क व आघाडीवर राहून काम करावे. पुराच्या कालावधीमध्ये 24 तास आपले फोन चालू ठेवावेत. ज्यांचा फोन बंद येईल. तो कामावर नाही असे समजण्यात येईल. आपत्तीजन्य परिस्थिती कधी तयार होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या संदेशाकडे लक्ष ठेवले पाहिजे.

सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी जलसंपदा विभागाने प्रत्येक गावात काय परिस्थिती निर्माण होईल, किती गावे पाण्याखाली जातील. याबाबत येत्या 15 दिवसात नागरिकांना समजावून सांगून पूरबाधित क्षेत्राच्या आराखड्यांबाबत प्रशिक्षण द्यावे. असे निर्देश जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची दूरदृष्यप्रणाली (व्ही. सी.) द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील उपस्थित होते. तर दुरदुष्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील यावेळी म्हणाले, मर्यादेपेक्षा जास्त पाऊस झाला तर आपण सर्वांनीच सहकार्याने नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करु. तथापि, याबाबत आपण पुर्व तयारी केल्यास जनतेलाही फार त्रास होणार नाही. पावसाळापुर्व व पावसाळा पश्चात करव्या लागणाऱ्या दुरुस्ती कामांसाठी आवश्यक साहित्य आत्ताच उपलब्ध करुन ठेवावे. पुरानंतर होणारी जी वाताहत आहे ती दिर्घकाळ चालते. त्यामुळे पूर येणार आहे हे गृहित धरुन ज्या अत्यंत आवश्यक वस्तू किंवा साहित्य त्या त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर पूर ओसरल्यानंतर तात्काळ कामे सुरु करता येईल. त्यामुळे कमी काळ लोकांना त्रास होईल.

यासाठी आपण सर्वांजण सतर्क रहाल असा मला विश्वास आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी पूरपरिस्थतीत अग्रभागी राहुन काम करायचे आहे. यामध्ये मागे राहुन चालणार नाही. पूरस्थितीत जिल्हा प्रशासनाने आघाडीवर व लोकांमध्ये राहून काम केले पाहिजे सर्वच संबधित अधिकाऱ्यांनी व यंत्रणांनी आपला सक्रिय सहभाग ठेवला पाहिजे. संबधित सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे. आपली अशी आपेक्षा आहे की मर्यादेतच पाऊस होईल आणि पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही.

धरणक्षेत्र वगळता कॅचमेंट भागात जास्त पाऊस पडतो त्यामुळे त्या पावसाचा फटका सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसतो. संभाव्य पूरस्थितीचा फटका बसू नये यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे व पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच पूरस्थितीत फ्रंटलाईनवर कार्यरत रहावे असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, या नैसर्गिक आपत्तीचा तिन्ही जिल्ह्यांना प्रचंड फटका बसतो. तो बसू नये याची दक्षता आत्तापासूनच घ्यायला हवी.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून आगामी 4 महिन्यात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन सुरु असून पुढील काही दिवसात कर्नाटक राज्यातील जलसंपदा मंत्री आणि प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचा विचार आहे. शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियाजन करुन उर्वरित पाणीसाठा कसा कमी करता येईल याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन करावे जेणेकरुन पूर परिस्थिती उद्भवणार नाही. तो धोका टाळता येईल जिवित आणि वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्याला अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यावेळी म्हणाले, सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पुराचा फटका कराड परिसराला बसतो या ठिकाणी पूरपरिस्थिती गंभीर होते. पूर होऊन गेल्यानंतर शासकीय मदत पूरविण्यासाठी बऱ्याच नियमांमध्ये समानता असणे आवश्यक आहे. असे सांगून पाण्याचा विसर्ग योग्य प्रमाणात होईल यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशी सूचना मांडली.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गैबी बोगद्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचेही योग्य प्रकारे नियोजन होणे आवश्यक आहे. गैबी बोगद्याची क्षमता 9 टीएमसी आहे. पुर्ण क्षमतेने पाणी सोडले गेल्यास पूरपरिस्थिती निर्माण होईल.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरपरिस्थितीपूर्वी करावयाच्या कामांसाठी लागणारी साधनसामुग्री आत्ताच तातडीने संबधित ठिकाणी पोहचविल्यास पूरपरिस्थिती नंतर करण्यात येणाऱ्या कामांना विलंब होणार नाही. तसेच ही कामे गतीने पुर्ण होतील अशी सूचना मांडली.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पूरस्थिती असणाऱ्या गावांच्या नकाशे पावसाळ्यापूर्वी त्यांच्या निदर्शनास आणून द्यावेत तसेच पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षणांचेही आयोजन करण्यात यावेत. सदरचे प्रशिक्षण पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांनाही देण्यात यावे, अशी सूचना मांडली.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी पूर काळात पडणारा पाऊस, वीज निर्मितीसाठी सोडण्यात येणारे पाणी तसेच धरणात साठा करुन ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करण्यात यावे. याबरोबरच आलमट्टी धरणातील विसर्ग जास्तीत जास्त प्रमाणात होऊन पाण्याचा फुगवठा होणार नाही याबाबत सर्व संबधित यंत्रणांनी समन्वय ठेऊन काम करण्याची सुचना मांडली.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी पूरपरिस्थिती अधिक गंभीर होऊ नये याबाबत सूचना मांडल्या. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले यांनी झूम ॲपवर पूर परिस्थिती आणि धरण क्षेत्रातील स्थितीबाबत सादरीकरण केले.