जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या घरी पोहोचले फडणवीस


जळगाव – सध्या राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर असून त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या जळगाव दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. गिरीश महाजनदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. भाजप सोडताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव दौऱ्यात फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी गेल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे.

एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मान्सूनपूर्व वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात थैमान घातले होते. यात केळी बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. देवेंद्र फडणवीस या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली.

भाजप सोडताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडत असल्याचा आरोप केला होता. भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान फडणवीस यांनीदेखील खडसेंच्या आरोपांना उत्तर देताना सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे अशा परिस्थितीतही फडणवीस यांनी खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिल्यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.