मिशन अनलॉक; मद्याची होम डिलिव्हरी करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय


नवी दिल्ली – कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी एकीकडे कठोर निर्बंध लावण्यात येत असतानाच दूसरीकडे मद्याच्या होम डिलिव्हरीसाठी दिल्ली सरकारने परवानगी दिली आहे. नव्या नियमानुसार मद्याची ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर दिली जाऊ शकते. यामध्ये देशी आणि विदेशी मद्याचा समावेश आहे.

यासाठी दिल्ली उत्पादन शुल्क (दुरुस्ती) नियम, 2021 मध्ये बदल करण्यात आल्यानंतर मोबाइल अ‍ॅप्स किंवा ऑनलाइन वेब पोर्टलचा वापर करून ऑनलाइन ऑर्डरद्वारे दिल्लीत दारूची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली जाईल. याआधीच्या नियमानुसार, दिल्लीत फक्त एल-१३ परवाना असणाऱ्यांनाच डिलिव्हरीसाठी परवानगी होती. ई-मेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे ऑर्डर मिळाली, असेल तरच निवासस्थानावर डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मोबाइलवरुन ऑर्डर घेण्यास मात्र मनाई होती.

पण आता दिल्ली सरकारच्या नव्या नियमानुसार, मोबाइल अ‍ॅप आणि पोर्टलच्या माध्यमातून मद्याची होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा अर्थ दिल्लीतील सर्व मद्याच्या दुकानांना डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त एल-१४ परवाना असणाऱ्यांनाच ही परवानगी आहे.

दिल्लीत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मद्याच्या दुकानांबाहेर भली मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. सर्वोच्च न्यायालयाने यानंतर मद्याची होम डिलिव्हरी करण्यासंबंधी विचार करण्याचा सल्ला दिला होता. यावेळीही एप्रिल महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर दिल्लीत मद्याच्या दुकानांबाहेर रांगा लागल्याचे चित्र दिसले होते.