महाराष्ट्राच्या एकाच जिल्ह्यातील 8 हजार मुलांना कोरोनाची लागण


मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात अद्याप सुरुच आहे. त्यातच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत भलेही घट होत असली तरी मृतांचा आकडा मात्र धडकी भरवणार आहे. अशातच कोरोनाच्या सुरुवातीपासून ते अद्यापपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. अचानक आलेल्या कोरोना संकटामध्ये झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या, वाढता मृतांचा आकडा, ऑक्सिजनसह बेडची कमतरता यासारख्या आरोग्य यंत्रणांतील त्रुटींचाही सामना महाराष्ट्राने केला आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांच्या एकूण आकड्यापैकी सर्वाधिक आकडाही महाराष्ट्राचाच आहे.

याच दरम्यान सध्या ज्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. ती कधीही येऊ शकते. तज्ज्ञांच्या निकषांनुसार, कोरोनाच्या आधीच्या दोन लाटांपेक्षा अधिक भयावह ही कोरोनाची तिसरी लाट असणार आहे. तसेच लहान मुलांना या लाटेचा सर्वाधिक धोका असणार आहे. अनेक लहान मुले या लाटेत कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतात. दरम्यान, ही तिसरी लाट केव्हा आणि कधी येणार, यासंदर्भात कोणतेही स्पष्ट दावे करण्यात आलेले नाहीत.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्र सामना करत आहे. याच दरम्यान आणखी एक धडकी भरवणारी आकडेवारी सध्या समोर आली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील ज्या लहान मुलांना कोरोनाची लागण झाली होती, त्याची आकडेवारी आता समोर आली आहे. जी अत्यंत धक्कादायक आहेत. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, केवळ मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यामधील जवळपास आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड तयार करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. सांगली शहरातील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्पेशल कोरोना वॉर्डही तयार करण्यात आला आहे. येथे सध्या पाच मुलांना कोरोनाची लागण झाली असून या स्पेशल वॉर्डमध्ये ते कोरोनावर उपचार घेत आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला माहीत नाही की, तिसरी लाट केव्हा येईल आणि ती किती धोकादायक असेल. पण त्यासाठी आम्ही आतापासूनच तयारी सुरु केली आहे. आम्ही लहान मुलांसाठी स्पेशल कोविड वॉर्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे. तिथे लहान मुलांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचाही आमचा प्रयत्न असणार आहे. या स्पेशल कोविड वॉर्डमध्ये आम्ही शाळा किंवा प्री-नर्सरी शाळांप्रमाणे वातावरण तयार करणार आहोत. जिथे मुले आनंदी राहू शकतील आणि उपचार घेऊ शकतील.