असे आहे जगातील दुसरे सर्वात महागडे निवासस्थान – अँँटिलिया


भारतामध्ये अनेक अब्जाधीशांच्या आलिशान निवासस्थानांपैकी रिलायन्स ग्रुपचे प्रमुख, नामांकित उद्योगपती मुखेश अंबानी यांचे ‘अँटिलिया’ हे निवासस्थान, हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहे. भारतातील सर्वात महाग खासगी प्रॉपर्टीज पैकी अँटीलिया एक असून, हे निवासस्थान जगातील दुसरे सर्वात महागडे निवासस्थान समजले जाते. या आलिशान निवासस्थानाची किंमत तब्बल दोन बिलियन डॉलर्स असून, इंग्लंडच्या राणीचे निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेस नंतर अँटिलिया हे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे आलिशान आणि सर्वात महाग निवासस्थान समजले जाते. मुंबईतील कंबाला हिल परिसरामध्ये हे आलिशान निवासस्थान उभे असून आजवर अनेक आंतरराष्ट्रीय साप्ताहिकांमध्ये, मासिकांमध्ये या निवासस्थानाची छायाचित्रे झळकली आहेत.

अँटिलियाची इमारत तब्बल सत्तावीस मजली असून, या निवासस्थानाची देखभाल करण्यासाठी सुमारे सहाशे कर्मचारी येथे तैनात असतात. या इमारतीमध्ये तीन हेलीपॅड्स, जलतरण तलाव, स्पा, सुंदर बगीचे, जकुझी, योग सेंटर, खासगी चित्रपटगृह, डान्स स्टुडियो, आईस्क्रीम पार्लर, आणि भव्य मंदिरही आहे. या घरातून समोर पसरलेल्या भव्य अरबी समुद्राचे दर्शन घडते. या इमारतीमध्ये अनेक लाउंज रूम्स असून, अनेक शयनकक्ष, आणि स्नानगृहे आहेत. या इमारतीमध्ये भव्य ‘बॉल रूम’ असून, या बॉलरूमचे छत सुंदर काचेच्या झुंबरांनी अलंकृत करण्यात आले आहे. अमेरिकेतील प्रख्यात स्थापत्यविशारादांनी या घराचे डिझाईन तयार केले होते.

अटलांटिक महासागरामध्ये, पोर्तुगाल आणि स्पेनच्या सागरी किनार्यांच्या जवळ एक द्वीप असल्याचे म्हटले जाते. या द्वीपाला ‘अँटिल आयलंड’ म्हटले जात असून, या नावावरूनच अंबानींच्या निवास्थानाचे नाव निवडले गेले आहे. मुकेश अंबानी यांच्या संग्रही अनेक आलिशान गाड्या असून, अँटिलिया इमारतीतील सहा मजले केवळ गाड्यांच्या पार्किंग साठी राखीव आहेत. या इमारतीमध्ये एका वेळी १६८ गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर गाड्यांचे सर्व्हिसिंग सेंटर देखील आहे. या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या सोबत आलेल्या वाहनचालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्षांची सोयही अँटिलिया मध्ये आहे.

Leave a Comment