सुनील ग्रोवरच्या ‘सनफ्लॉवर’ सिरीजचा ट्रेलर रिलीज


सध्या वेब सिरीजच्या चित्रीकरणामध्ये कॉमेडियन सुनील ग्रोवर व्यस्त आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खानच्या ‘तांडव’ या सिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. तो आता लवकरच ‘सनफ्लॉवर’ या सिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

सनफ्लॉवर नावाची सोसायटी २ मिनिटे २५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तेथे राहणाऱ्या लोकांचे विचित्र वागणे पाहून पोलिसांना काही तरी गडबड असल्याचे जाणवते. ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी आणि मराठमोळे अभिनेते गिरीश कुलकर्णी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. दरम्यान प्रेक्षकांची मने सुनील ग्रोवरने साकारलेल्या भूमिकेने जिंकली आहे. या सिरीजचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘सनफ्लॉवर’ या कॉमेडी थ्रिलर सिरीजचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही सिरीज ११ जून २०२१ रोजी रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना ही सिरीज झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. सुनील ग्रोवरसोबत या सिरीजमध्ये रणवीर शौरी, गिरीश कुलकर्णी, आश्विन कौशल, आशीष विद्यार्थी, शोनाली नागरानी हे कलाकार दिसणार आहेत.