कॅमेऱ्यात कैद झाला सुशील कुमारने केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ


नवी दिल्ली – ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सागर धनखडचा छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या अमानुष मारहाणीनंतर मृत्यू झाला होता. यानंतर सुशील कुमार आपल्या साथीदारांसोबत फरार होता. पोलिसांनी अखेर त्याच्यासहित इतर आरोपींना अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान सागर धनखडवर सुशील कुमारने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.


सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी माजी कनिष्ठ राष्ट्रीय विजेत्या सागरला सुमारे २५ मिनिटे मारहाण केली होती. पोलीस नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ही मारहाण थांबवण्यात आली. शहरातील कुस्ती क्षेत्रात आपली दहशत पसरवण्यासाठी हत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, अशी माहिती सुशील कुमारने पोलिसांनी दिली आहे.

आपला मित्र प्रिन्सला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुशील कुमारने सांगितले होते. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीडितांना जनावरांप्रमाणे मारहाण केली. त्याला कुस्ती क्षेत्रात आपली दहशत निर्माण करायची होती, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती.