…तर नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करू, छत्रपती संभाजीराजांची घोषणा


मुंबई : मराठा आरक्षणावरुन आक्रमक झालेल्या छत्रपती संभाजीराजांनी राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. संभाजीराजे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करीत आहे. त्यांनी यावेळी अनेक बड्या नेत्यांबरोबरच कायदेतज्ज्ञांचीही भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीराजे हे नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असून ते लवकरच भाजपच्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संभाजीराजेंनी तसे संकेतही आजच्या पत्रकार परिषदेत दिले आहेत. बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष स्थापन करण्याची विचार करू अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी संभाजीराजे हे नवा पक्ष किंवा संस्था स्थापन करू शकतात. त्याचबरोबर मराठा ते बहुजन समाजाला एकत्र आणत आरक्षणाचा मुद्दा ते लावून धरू शकतात. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केले आहे.