कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांच्या नावे ५ लाख ठेवा; मुख्यमंत्र्यांकडे यशोमती ठाकूर यांचा प्रस्ताव


मुंबई – राज्यातील अनेक मुलांनी कोरोनामुळे आई-वडील, तर काहींच्या आई किंवा वडील असे छत्र गमावले आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकार बाल संगोपन योजना राबविण्याचा विचार करत असून राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत महिला बाल विकास विभाग करत असलेल्या कामांची यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली. कोरोनामुळे आई-वडील दोन्ही गमावलेल्या मुलांच्या नावावर बँकेत 5 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट ठेवण्याचा प्रस्ताव यावेळी मांडला. तसेच ज्या मुलांचे आई किंवा वडील गेले त्यांच्या संगोपनासाठी महिन्याला 2500 रुपये देण्यात यावेत, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचविले.

ही मदत महाराष्ट्र सरकारच्या बाल संगोपन योजनेद्वारे करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. या प्रस्त्वावावर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले.