दिलासादायक ; राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घसरण


मुंबई – महाराष्ट्रातील संपूर्ण एप्रिल महिना वेगाने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या मे महिन्याच्या शेवटाकडे आता ओसरु लागली आहे. नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ३० हजारांच्या खालीच राहत असून ती आता वीस हजारांच्या घरात पोहोचली आहे.

राज्यात शुक्रवारी दिवसभरात एकूण २० हजार ७४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६ लाख ९२ हजार ९२० एवढा झाला आहे. पण, सध्या राज्यात त्यातील फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मृतांचा आकडा ५०० च्या खाली उतरला आहे. राज्यात आज दिवसभरात ४२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, मृतांचा आकडा नियंत्रणात कसा आणता येईल आणि मृत्यू टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, हे प्रशासना समोरचे मोठे आव्हान आहे. आजच्या आकड्यांची भर पडल्यानंतर राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा ९३ हजार १९८ एवढा झाला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात मुंबई महानगर पालिका क्षेत्रात ९२९ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यासोबत १२३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पण, त्याचवेळी ३० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.