मराठा आरक्षणविरोधामध्ये भाजप पदाधिकारी न्यायालयीन लढाईत होते सहभागी; काँग्रेसने पुरावे देत केला गौप्यस्फोट


मुंबई – मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाजपकडून ठाकरे सरकारची आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोंडी केली जात असल्याचे दिसत आहे. भाजपकडून वारंवार आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचा दावा केला जात असून, तर राज्यातील सत्ताधारी पक्ष हे केंद्राच्या अधिकारात असल्याचे सांगत आहेत. मराठा आरक्षणाला भाजपकडूनच विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी याच मुद्द्यावरून काही कागदपत्रे ट्विट केली असून, #SaveMeritSaveNation भाजप व संघाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. सावंत यांनी यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही सवाल केला आहे.


सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली. भाजपकडून राज्य सरकारने नीट बाजू मांडली नसल्याचा दावा करण्यात आला. तर विरोधकांकडून आरक्षण रद्द व्हावे म्हणून भाजपकडून प्रयत्न केले गेले, असा आरोप करण्यात आला. यावरून आता वाद रंगला असून, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी Save Merit Save Nation संघटना भाजपशी आणि संघाशी संबंधित असल्याचे गौप्यस्फोट केला आहे.


सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपचे पदाधिकारी असल्याचे कागदपत्रे सचिन सावंत यांनी ट्विट केली आहेत. मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपचे पदाधिकारी कसे? याचे महाराष्ट्र भाजपने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?, असा संतप्त सवाल सावंत यांनी केला आहे.


डॉ. अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते, तेव्हा भाजप गप्प का होती? न्यायालयात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत होते, तेव्हा भाजप गप्प का होती? हे मूक समर्थन होते का? मागून पाठिंबा दिला का? महाराष्ट्र भाजपने उत्तर द्यावे, असे आव्हान सावंत यांनी दिले आहे.

मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला भाजपनेच रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या #SaveMeritSaveNation या संस्थेचे भाजप व संघाचे नागपूर कनेक्शन आहे. मराठा आरक्षणविरोधामध्ये भाजप पदाधिकारी न्यायालयीन लढाईत सहभागी होते, असा आरोप करत सावंत यांनी भाजपवर प्रहार केला आहे.