राज्यातील लॉकडाऊन वाढला, पण काही ठिकाणी नियम शिथिल करणार : राजेश टोपे


मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जरी राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. लॉकडाऊन सरसकट उठवला जाणार नाही. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन घेतील, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

कोरोना व्हायरस नव्या प्रकारचा आहे, तो मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन पूर्णपणे हटवता येणार आहे. पण लॉकडाऊनमध्ये काय शिथिलता देता येईल याबाबतचे बारकावे तपासले जातील, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, एस्ट्राझेनेका, जॉन्सन एन्ड जॉन्सन या कंपन्यांकडून ग्लोबल टेंडरमध्ये प्रतिसाद आला आहे. काही कंपन्यांनी किंमत दिली आहे. तर काही कंपन्यांनी किमतीबाबत माहिती दिली नाही. दरम्यान, केंद्राकडून सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक या लसींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. इतर लसींनाही परवानगी देण्याबाबतचा विषय केंद्राचा असल्यामुळे लसींच्या आयातीबाबत राष्ट्रीय पातळीवर एक धोरण निश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, लॉकडाऊनमधून सूट देताना ती 3-4 टप्प्यांत दिली जाईल. रेड झोनमधील गावांबाबत सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. ज्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही, तिथे थोडी सवलत द्यावी, असा विचार आहे. तसेच बाकीच्या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करावा आणि शिथिलता द्यावी, असा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.