
मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना गेल्या आठवड्यात तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच या नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. अशातच ठाकरे सरकारने या चक्रीवादळग्रस्तांसाठी 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या याबद्दलचा शासन निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
तोक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून 250 कोटींचे पॅकेज जाहीर
याबाबत बोलताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, सात जिल्ह्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. एनडीआरएफच्या निकषांच्या पलिकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार ‘तोक्ते’ चक्रीवादळात 72 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण महाराष्ट्र सरकारने 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील वादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय झाला आहे. त्यासाठी कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये विजेच्या भूमिगत वायर टाकण्यात येणार आहेत, निवारेही बांधण्यात येणार आहेत.
अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन या सर्व कामांची आवश्यकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली असून त्यांचे प्रस्ताव मागवले आहेत. तसेच तोक्ते चक्रीवादळासंदर्भात काल बैठक घेण्यात आली आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भातील शासन निर्णय काढण्याचे बैठकीत ठरवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी स्वतः 21 मे रोजी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल आणि कुणालाही वंचित ठेवणार नसल्याचे म्हणत आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. तोक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी आज 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
