करोना लस दिलेल्या १२ वर्षावरील मुलांना हृदयात वेदना?

करोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरात सुरु असलेल्या कोविड १९ लसीकरण मोहिमेत अमेरिकेत १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरु करण्याचा घेतला गेलेला निर्णय अडचणीत आला आहे. १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरु झाले असताना काही मुलांना ही लस घेतल्यावर हृदयात वेदना होण्याचा त्रास झाल्याचे पुढे आले असल्याने अर्मेरीकन आरोग्य संस्था, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीवेंशनने या संदर्भात अधिक तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.

लस दिलेल्यापैकी काही मुलांना चार दिवसांनंतर हृदयात वेदना झाल्याचे प्रकार समोर आले असले तरी वॅक्सिन सेफ्टी ग्रुपने याच्याशी लसीचा काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. मुलांना हृदय वेदना होण्याचा जो त्रास होतो आहे त्याला मायोकार्डीटीस म्हणतात. यात हृदयाच्या पेशींना सूज येते. पण अन्य संसर्गामुळे सुद्धा असा त्रास होऊ शकतो असे सांगितले जात आहे. असे असले तरी लसीमुळे हे होत नाही ना यावर पूर्ण लक्ष दिले जाणार आहे.

या मुलांना फायझर, मॉडर्नाची लस दिली गेली आहे. विशेष म्हणजे लस दिलेल्या मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये हा त्रास अधिक असल्याचे दिसून येत आहे. अर्थात यामुळे लसीकरण कार्यक्रमात बदल होणार नसून लसीकरण सुरूच राहणार असल्याचा खुलासा केला गेला आहे. आकडेवारी सांगते, १३ मे पर्यंत अमेरिकेत ३९ लाख मुलांना करोना संसर्ग झाला होता, त्यातील १६ हजार जणांना हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावे लागले आणि त्यातील ३०० जणांचा मृत्यू झाला आहे.