सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार मुंबई लोकल? विजय वडेट्टीवारांनी दिले उत्तर


मुंबई – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून कठोर निर्बंध सर्वसामान्यांवर लावण्यात आले आहेत. राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकलचे दरवाजे अजून पुढील १५ दिवसांसाठी उघडले जाणार नाहीत अशी शक्यता व्यक्त केली आहे.

सोशल डिस्टन्सिंग लोकल ट्रेनमध्ये पाळणे शक्य नाही. त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु राहतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. दरम्यान त्यांनी यावेळी कोरोनाबाधितांची संख्या खालावत असलेल्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती दिली आहे.

१ जूननंतर रेड झोनच्या बाहेर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध शिथील करण्यासंबंधी राज्य सरकार विचार करत आहे. सध्या ३६ पैकी १५ जिल्हे रेड झोनमध्ये असून तिथे निर्बंध अजून कठोर केले जाऊ शकतात, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदूर्ग, सोलापूर, अकोला. सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्याची माहिती दिली.

मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले जावेत अशी मागणी होत असून सरकार निर्णय जाहीर करण्याआधी पुढील चार ते पाच दिवस परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.