ठाकरे सरकार आणि महापालिकांकडे मनसेची महत्त्वाची मागणी


मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश आणि राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढले आहे. बेड, ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक घरातील कर्ती माणसे गेल्यामुळे अशा कुटुबांवर दुःखाच्या डोंगराबरोबरच आर्थिक डौलाराही कोसळला आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकार आणि महापालिकांकडे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या कोरोना पीडितांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाची मागणी केली आहे.

भयावह परिस्थिती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झाली. आरोग्य सुविधांची वाणवा निर्माण झाली. बाधितांच्या नातेवाईकांचे बेड, औषधी आणि ऑक्सिजनसाठी हाल झाले. एवढे करूनही अनेकांना आपल्या प्राणप्रिय व्यक्तींना गमवावे लागले. यात अनेकांनी कुटुंबाचा आधार असलेल्या आणि आर्थिक डौलार सांभाळणाऱ्या कुटुंबप्रमुखांना गमावले. तर अनेकांना जमा केलेली पुंजी कुटुंबातील व्यक्तीच्या उपचारासाठी खर्च करावी लागल्यामुळे ही कुटुंब आर्थिक समस्यांचा सामना करताना दिसत आहेत. एका महत्त्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून ठाकरे सरकारचे लक्ष वेधले आहे.


महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका या श्रीमंत आहेत. अनेकांकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्याच कामाला आला पाहिजे. कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणे गरजेचे आहे. सर्वच स्थानिक संस्थांनी हे त्वरित करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. राज्य सरकारने सरसकट तसा आदेशच द्यायला हवा. सरकारने/महापालिकांनी जनतेप्रती आपली जवाबदारी झटकू नये, असे बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.