ट्विटरवर ब्लू टिक मिळविण्यासाठी कोण आणि कसा करावा अर्ज?


मुंबई : आपली वेरिफिकेशनची प्रक्रिया मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) सुरू करत आहे. यानंतर आपल्या ट्विटर अकाउंटवर यूजर्सना ब्लू टिक देखील मिळू शकेल. पण यूजरला यासाठी ट्विटरने केलेल्या कॅटेगरीमध्ये फिट बसावे लागेल. या कॅटेगरीमध्ये आपण बसत असल्यास, आपल्याला ब्लू टिक मिळू शकते. कोणीही ब्लू टिकसाठी अर्ज करू शकतो. पण यासाठी अर्ज कसा करावा, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल.

ट्विटरच्या मते, ब्लू टिक मिळवण्यासाठी Authentic, Notable आणि Active यूजरचे अकाऊंट असणे अनिवार्य आहे. यामध्ये Authentic म्हणजे अकाऊंट फेक नसून खरेखुरे असणे आवश्यक आहे. Notable म्हणजे ट्विटरने तयार केलेल्या सहा प्रकारांपैकी एकामध्ये फिट होणे आवश्यक आहे. या कॅटेगरी सरकार, कंपनी किंवा ब्रँड आणि ऑर्गनायजेशन, न्यूज ऑर्गनायजेशन किंवा जर्नलिस्ट, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स आणि गेमिंग, अॅक्टिविस्ट अशा आहेत.

तसेच अकाऊंट अॅक्टिव्ह म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून हे अकाऊंट आपण सतत वापरत असणे आवश्यक आहे. तसेच अकाऊंटवर आपली माहिती असते, म्हणजेच यूजरचे नाव आणि प्रोफाइल फोटो यासारखी आपली माहिती असावी. त्याचबरोबर तुमच्या अकाऊंटचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरही असावा. याशिवाय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आपणास ट्विटरद्वारे बंदी घातलेली नसावी. आपण या सर्व अटींमध्ये आपण बसत असल्यास ब्लू टिकसाठी अर्ज करू शकता.

यूजरला ब्लू टिकसाठी अप्लाय करण्यासाठी अकाऊंट सेटिंगमध्ये जाऊन ‘Request Verification’ वर क्लिक करावे लागेल. पण हे बटन अद्याप दिसत नाही, ते लवकरच दिसू लागेल. आपल्याला या बटनवर क्लिक करण्यासाठी संबंधित कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. तसेच आयडी कार्ड देऊन पुरावा द्यावा लागेल. या व्यतिरिक्त अधिकृत वेबसाइटची लिंकही द्यावी लागेल, जी आपल्या ट्विटर खात्याची पुष्टी देईल.

अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, काही दिवसांनंतर आपल्याला ट्विटरकडून एक मेल प्राप्त होईल. आपला अर्ज मंजूर झाल्यास आपोआप ब्लू टिक आपल्या अकाऊंटसमोर दिसेल. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत नसाल, तर काही काळानंतर ट्विटर आणखी कॅटेगरी अॅड होणार आहेत.