तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग मुलांना होण्याची शक्यता कमी, एम्सच्या संचालकांचा दावा


नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यनंतर आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत आहे. पण अद्यापही देशभरात दररोज सव्वादोन लाखांच्या घरात कोरोनाबाधित आढळत आहेत. अद्याप कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट ओसरले नसताना सरकार आणि प्रशासनाला तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. अशातच लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात असल्यामुळे पालकही चिंतेत होते. पण एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग मुलांना होईल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. देशभरातील पालकांना डॉ. गुलेरिया यांच्या दाव्यानंतर नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, लहान मुले कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जास्त प्रभावित झाले नसल्यामुळेच तिसऱ्या लाटेतही लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल, असे वाटत नाही किंवा तसे कोणते संकेतही मिळत नाहीत.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आकडेवारी पाहिली तर यात खुप समानता आहे. यामध्ये लहान मुलं सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. तसेच मुलांना कोरोना झाला तरी लक्षणे सौम्य आहेत. तोच कोरोना व्हायरस आहे, त्यामुळे असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत की मुलांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

लहान मुलांना तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका असल्याचा दावा ज्यांनी केला आहे, त्यांचे म्हणणे आहे की मुलांमध्ये अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झालेला नाही. म्हणूनच तिसऱ्या लाटेत याचा संसर्ग लहान मुलांना जास्त होऊ शकतो. पण यापुढे मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे, याचे कोणतेही पुरावे नसल्याचे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले.

दरम्यान डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाप्रमाणे म्युकरमायकोसिसचा (ब्लॅक फंगस) एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रसार होत नाही. ब्लॅक फंगस हा संसर्गजन्य आजार नाही. ब्लॅग फंगसचा संसर्ग मधुमेहग्रस्त लोकांमध्ये होण्याचा जास्त धोका असतो, अशी माहिती दिली. ब्लॅक फंगस होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या आजारावर लवकर उपचार केल्यास फायदा होतो. ब्लॅक फंगसची लागण झालेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ बसल्याने पसरत नसल्याचेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.