लसीकरणासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय; आता ऑन साईट होणार रजिस्ट्रेशन


नवी दिल्ली – केंद्र सरकारने राज्य सरकारांनी केलेल्या वेगवेगळ्या सुचना आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारावर आता ऑन-साईट रजिस्ट्रेशन आणि समूह नोंदणीची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे लसींचा अपव्यय टाळण्यासाठी मदत होणार आहे.

जर लोक लसीकरणासाठी दिलेल्या नियोजित वेळेत आले नाहीत आणि जर दिवसाखेरीज काही लसीचे डोस शिल्लक राहतात. हे लसीचे डोस वाया जाऊ नयेत म्हणून काही व्यक्तींना साईटवर रजिस्ट्रेशन करुन लस दिली जाणार आहे.

4 लाभार्थींची नोंदणी CoWIN अॅपवर एका मोबाईल क्रमांकावरुन केली जाऊ शकते. आरोग्य सेतु आणि उमंग यांसारख्या अॅपच्या माध्यमातून नोंदणी आणि अपॉइंटमेंट दिली जाते. ज्यांच्याकडे इंटरनेट, स्मार्ट फोन किंवा मोबाईल फोनही नाही, अशा व्यक्ती Cohort’s मोहिमेचा फायदा घेऊ शकतात.

18 ते 44 वर्षांच्या व्यक्तींसाठी Cowin वर ऑन साईट रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट सुरु केल्या आहेत. सध्या केवळ सरकारी COVID लसीकरण केंद्रांसाठीच ही सुविधा आहे. सध्या खाजगी कोविड व्हॅक्सिन सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे खाजगी लसीकरण केद्रांमधील लसीकरण मोहिमेला विशेष स्वरुपात ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या स्लॉटसह प्रकाशित करावे लागणार आहे.

राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना 18 ते 44 वर्षांच्या वयोगटातील ऑन साइट रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट सुविधेचा वापर करण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्देश दिले आहेत. तसेच ही पद्धत आणि त्यासंबंधातील राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशांचे सक्तीने पालन करण्यासाठी सर्व जिल्ह्याच्या लसीकरण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

स्पेशल सेशन्सही Cohort समुहात येणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी आयोजित करता येणार आहेत. जिथे इंटरनेटचा वापर न करणाऱ्या, तसेच स्मार्टफोन नसणाऱ्या व्यक्तींना लसीकरणासाठी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सल्ला दिला आहे की, लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी 18-44 वयोगटातील व्यक्तींसाठी ऑन-साइट रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट सुरु करताना सावध भूमिका घ्यावी. तसेच योग्य नियोजन करावे. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये गैरसमजही निर्माण होणार नाहीत.