वजन घटविण्यासाठी आहारात समाविष्ट करा ओट्स पराठा


वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यायामासोबत आहारावर नियंत्रण ठेवणेही अतिशय महत्वाचे असते. अनेकदा निरनिराळ्या आहारपद्धती अवलंबत असताना आपल्याला आवडत्या चविष्ट पदार्थांचा त्याग करणे आणि बेचव भोजन खाणे अपरिहार्य ठरत असते. त्यामुळे अनकेदा काही दिवस डायट केल्यानंतर आपल्या मनावरचा ताबा सुटू लागतो आणि आपला मोर्चा पुन्हा एकदा चविष्ट, खमंग पदार्थांकडे वळतो. मात्र आजच्या काळामध्ये विकसित केल्या गेलेल्या नव्या आहार पद्धतींमध्ये आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग न करता त्यासाठी पर्यायी पदार्थ सुचविले जात असल्याने कंटाळा न करता डायट फॉलो केले जात असते. याचे उदाहरण म्हणजे ओट्स पराठा.

अनेकांना वजन कमी करण्यासाठी ग्लुटेन युक्त पदार्थ टाळण्याचा सल्ला आहारतज्ञ देत असतात. त्यामुळे गव्हाची पोळी आपोआपाच आहारातून बाद होते. गव्हाच्या पोळीऐवजी ओट्सपासून बनविलेली पोळीही तितकीच चविष्ट लागते, आणि ओट्स ग्लुटेन मुक्त असून त्यामुळे वजन घटण्यासही मदत होते. ओट्समध्ये कॅलरीजची मात्रा कमी असून, यामध्ये बीटा ग्लुकोनची मात्रा जास्त असते, ज्यामुळे कोलेस्टेरोल नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना वजन घटवायचे आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये ओट्सचा समवेश करावा. ओट्स अनेक प्रकारे आहारामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. यापासून स्मूदी, लापशी बनविली जाऊ शकते, त्याचप्रमाणे ओट्सची पोळीही बनविली जाऊ शकते.

ओट्सची पोळी किंवा पराठा बनविण्यासाठी अर्धा कप ओट्स, बारीक चिरलेला एक लहान कांदा, अर्धा कप कोंडायुक्त गव्हाचे पीठ, दोन चमचे चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आणि पोळीला लावण्यासाठी तेल, इतक्या साहित्याची आवश्यकता आहे. ही पोळी तयार करण्यासाठी सर्वप्रथम ओट्स तव्यावर किंवा एखाद्या कढईमध्ये कोरडेच भाजून घ्यावेत. त्यानंतर मिक्सरवर वाटून घेऊन ओट्स बारीक दळून घ्यावेत. ओट्सची पूड कोंडायुक्त गव्हाच्या पीठामध्ये मिसळून यामध्ये चवीला मीठ घालून पीठ मळून घ्यावे. दुसऱ्या भांड्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ एकत्र करावे. भिजविलेल्या पीठाचा एक गोळा करून त्याची लहानशी पारी करून घ्यावी त्यामध्ये कांदा-कोथिंबीरीचे मिश्रण भरून घेऊन पारी बंद करावी आणि हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यावा. तवा गरम करून हा पराठा तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा. पराठा भाजत असताना त्याला दोन्ही बाजूंनी थोडे तेल लावावे. हा पराठा पोळीप्रमाणे चांगला फुगवावा. त्यामुळे पराठा नरम राहतो. आपल्या आवडत्या भाजीसोबत किंवा दह्यासोबत गरमागरम ओट्स पराठा सर्व्ह करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment