असे बदलता येईल आधार कार्ड वरील आपले छायाचित्र


प्रत्येक भारतीय नागरिकाच्या दृष्टीने आधार कार्ड हे महत्वपूर्ण दस्तऐवजांपैकी एक आहे. आधार कार्ड नागरिकाचे अधिकृत ओळखपत्र असून, कोणत्याही आर्थिक देव-घेवीसाठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड जारी करणारी संस्था ‘UIDAI’ असून आधारकार्ड वरील माहिती अपडेट करण्याची सुविधा आता ‘UIDAI’च्या द्वारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत आधारकार्ड धारकाचे नाव, जन्मतारीख इत्यादी माहितीमध्ये चुका असल्यास, किंवा आधारकार्ड धारकाचा पत्ताबदल करायचा असल्यासही योग्य दस्तऐवजांच्या सह ऑनलाईन माहिती अपडेट करणे आता शक्य झाले आहे.

अनेकदा आधारकार्डावरील कार्ड धारकाचे छायाचित्र जुने असते, किंवा अस्पष्ट असते. आता हे छायाचित्र देखील कार्डधारकांना अपडेट करता येणार असून, यासाठी दोन पद्धतींचा वापर करता येणार आहे. पहिली पद्धत ही, की आपल्या आधारकार्डवरील छायाचित्र बदलण्याची लेखी विनंती ‘UIDAI’च्या कार्यालयामध्ये करून आधारकार्डवर छायाचित्र अपडेट करविता येऊ शकते. या लेखी विनंतीपत्राच्या सोबत सध्या अस्तित्वात असलेल्या आधारकार्डची प्रत आणि अपडेट करायचे असलेले नवे छायाचित्र UIDAIच्या कार्यालयामध्ये द्यायचे असते. जर विनंतीपत्र मान्य झाले आणि इतर माहितीही योग्य असली, तर साधारण पंधरा ते वीस दिवसांमध्ये अपडेट झालेले नवे छायाचित्र असणारे नवे आधारकार्ड अर्ज करणाऱ्याला मिळू शकते.

आधार कार्डवरील छायाचित्र अपडेट करण्यासाठी असलेल्या आणखी एका पद्धतीनुसार UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून ‘एनरोलमेंट फॉर्म’ डाउनलोड करून तो फॉर्म योग्य माहितीच्या आधारे भरावा. हा भरलेला फॉर्म आपल्या घराजवळील आधार एनरोलमेंट सेंटरवर जमा करायचा असून, तिथे ‘बायोमेट्रिक’साठी आवश्यक असलेली प्रक्रियाही पूर्ण करायची असते. त्यानंतर कार्डधारकाचा फॉर्म स्वीकारणारा कर्मचारी, कार्ड धारकाचे नवे छायाचित्र घेत असून, त्यासाठी पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते. या पंचवीस रुपयांच्या शुल्कावर अतिरिक्त जीएसटी ही लागू असतो. या शुल्काचा भरणा केल्यानंतर कार्डधारकाला ‘युआरएन’ नंबर असलेली पावती देण्यात येऊन या नंबरच्या आधारे कार्डच्या अपडेटची माहिती ऑनलाईन उपलब्ध होत असते. छायाचित्र अपडेट झाल्यानंतर नवे छायाचित्र असलेले आधारकार्ड कार्डधारकाला देण्यात येते.

Leave a Comment