केरळमधील अनंतपुर लेक मंदिराचे रक्षण करीत आहे ही मगर !


केरळमध्ये कासारगोड जिल्ह्यातील मंजेश्वरम तालुक्यामध्ये अनंतपुर नामक गाव आहे. या गावामध्ये असलेल्या सरोवराच्या मधोमध अनंतपद्मनाभस्वामी मंदिर आहे. याच मंदिराचा उल्लेख अनंतपूर मंदिर म्हणूनही करण्यात येतो. हे मंदिर पद्मनाभस्वामीचे ‘मूलस्थान’ मानले जात असल्यामुळे या मंदिरामध्ये भाविकांची सतत मोठी गर्दी पहावास मिळते. याच ठिकाणी अनंतपद्मनाभस्वामी प्रथम अवतरल्याची आख्यायिका प्रसिध्द असल्याने या मंदिराला मोठे महत्व आहे. अनंतपूरमधील सरोवराच्या मधोमध असलेल्या अनंतपुर मंदिराचा परिसर सुमारे दोन एकर जागेमध्ये विस्तारलेला असून, या मंदिरामध्ये जाताना सरोवरामध्ये एक गुफाही आहे. अनंतपद्मनाभस्वामींनी तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी याच गुहेतील मार्गाचा वापर केला असल्याची आख्यायिका प्रसिद्ध असल्याने या गुहेचे दर्शन घेण्यासाठी देखील भाविक आवर्जून येत असतात.

या मंदिराची खासियत अशी, की या सरोवरामध्ये एक मगर असून, ही मगर गेली अनेक दशके या मंदिराचे रक्षण करीत असल्याची भाविकांची मान्यता आहे. या मंदिरामध्ये मिळणारा प्रसाद या मगरीला खाऊ घातला जातो. या मगरीचे नाव बाबिया असून, ही मगर संपूर्ण शाकाहारी आहे. गेली अनेक दशके ही मगर याच सरोवरामध्ये असून, या सरोवरामध्ये आणखीही मगरी असण्याची शक्यता वर्तविली जात असते. मात्र इथे एका वेळी एकच मगर दृष्टीस पडते. त्यामुळे बाकी मगरी येथे खरेच आहेत किंवा नाही याची पडताळणी अद्याप कोणी केलेली नाही. या मगरीच्या भोजनाची वेळही ठरलेली असून, भोजनाच्या ठरलेल्या वेळी ही मगर भोजनासाठी येते. मंदिरामध्ये दुपारच्या पूजेसाठी अर्पण केला जाणारा भात आणि गुळाचा प्रसाद बाबियालाही खाऊ घातला जातो. भाविक मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाबियाला पाहण्यासाठीही गर्दी करीत असतात.

Leave a Comment