स्वित्झर्लंड येथे आलिशान ‘बेडरूम थियेटर’


स्वित्झर्लंड येथील स्प्राईटेनबाख शहरामध्ये एक आगळे, अत्याधुनिक आलिशान थियेटर सुरु झाले असून, हे थियेटर ‘बेडरूम सिनेमा हॉल’ या नावाने ओळखले जात आहे. येथे चित्रपट पहावयास येणाऱ्या दर्शकांना अविस्मरणीय आणि चांगला अनुभव येऊन दर्शकांनी वारंवार या चित्रपटगृहामध्ये यावे आणि त्यांचे चांगले अनुभव ऐकून इतर दर्शकांनीही आवर्जून या थियेटरला भेट द्यावी असा उद्देश या चित्रपटगृहाच्या निर्मात्यांचा आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी देखील अनेक खास सवलती या थियेटरच्या वतीने देण्यात येत आहेत.

‘पाथ’ नामक कंपनीने हे चित्रपटगृह बनवविले असून, या चित्रपटगृहामध्ये दर्शकांसाठी केवळ खुर्च्या न पुरविल्या जाता, चक्क डबलबेड पुरविण्यात आले आहेत. या बेड्सवर आरामात पहुडून दर्शक मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात. या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार हे चित्रपटगृह नेहमी स्वच्छ राहील याची आणि येथे येणाऱ्या दर्शकांना कसल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची काळजी, चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. चित्रपटाच्या प्रत्येक शो नंतर येथील डबलबेड्सवरील चादरी आणि उश्यांचे आभ्रे बदलले जाऊन त्याऐवजी स्वच्छ धुतलेल्या चादरी बेड्सवर घातल्या जातात.

या चित्रपटगृहामध्ये एकूण अकरा डबल बेड्स असून, या बेड्सला असणारे ‘हेडरेस्ट’ ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे हलविता येऊ शकतात. तसेच चित्रपट पाहताना आपल्या आवडीचे भोजनही दर्शक येथे ऑर्डर करू शकतात. येथे भोजनाचे अनेक पर्याय दर्शकांसाठी उपलब्ध असून, येथील सर्वच पदार्थ अतिशय चविष्ट असल्याचे अनेक दर्शकांनी म्हटले आहे. या अलिशान थियेटरमध्ये चित्रपटाचा एक शो पाहण्यासाठी दर्शकांना प्रतिव्यक्ती अठ्ठेचाळीस डॉलर्स मोजावे लागतात. भारतीय चलनामध्ये ही किंमत सुमारे साडेतीन हजार रुपये इतकी आहे.

Leave a Comment