शरीराला सतत दुर्गंधी येत असल्यास…


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत घाम आल्याने शरीराला घामाची दुर्गंधी येणे सामान्य असले, तरी दिवसभर वातानुकुलित ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये राहून, अजिबात घाम न येताही काही व्यक्तींच्या शरीराला दुर्गंधी येत असते. कधी कधी ही दुर्गंधी इतकी जास्त असते, की त्याचा त्रास त्या व्यक्तीच्या आसपासच्या लोकांनाही जाणवू लागतो. अनेकदा शरीराची दुर्गंधी लपविण्यासाठी डियोडरंट्स किंवा परफ्युम्सचा वापर करूनही शरीराची दुर्गंधी लपून राहू शकत नाही. अशा प्रकारची दुर्गंधी शरीराला येत असल्यास या मागची संभाव्य कारणे विचारात घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

माणूस असो, किंवा एखादा प्राणी, प्रत्येकाच्या शरीराला एक विशिष्ट गंध असतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाचे राहणीमान, स्वच्छता यावरही शरीराचा गंध अवलंबून असतो. शरीराला दुर्गंधी येण्यामागे अनेक करणे असू शकतात. यापैकी शारीरिक अस्वच्छता हे सर्वात महत्वाचे कारण असते. ज्यांना शारीरिक श्रम जास्त करावे लागतात, किंवा दिवसभर घराबाहेर उन्हामध्ये फिरून काम करावे लागते अशा व्यक्तींनी दिवसातून किमान दोन वेळा स्नान करणे आवश्यक असते. तसेच सतत घाम येत असेल, तर दररोज स्वच्छ धुतलेले सुती कपडे परिधान करणे चांगले. अशा व्यक्तींनी आपली पादत्राणे देखील वारंवार हवेवर वाळण्यास ठेवणे गरजेचे असते.

अनेक व्यक्तींच्या बाबतीत शारीरिक दुर्गंधी आनुवांशिक असते, तर अनेकदा मनावर आलेला अवाजवी तणावही अतिरिक्त घामाला कारणीभूत ठरत असून, शारीरिक दुर्गंधी निर्माण करणारा ठरतो. त्याशिवाय शरीराच्या ब्लड शुगर लेव्हल्समध्ये वाढ झाल्यास त्यामुळे शरीराबरोबर तोंडातून देखील दुर्गंधी येऊ लागते. हे लक्षण जाणविल्यास वैद्यकीय सल्ला घेणे अगत्याचे असते. तसेच ज्या महिला काही विशिष्ट गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करीत असतील त्यांच्या शरीरातूनही दुर्गंधी उद्भवू शकते. यामागचे कारण असे, की या गर्भनिरोधक गोळ्यांच्या परिणामस्वरूप सतत घशाला कोरड पडते. जर वारंवार पाणी प्यायले गेले नाही तर त्यामुळे उद्भवणाऱ्या डीहायड्रेशनमुळे तोंडातील सल्फरच्या प्रमाणात वाढ होऊन दुर्गंधी उद्भवते. जर शरीरामध्ये काही जीवनसत्वांची आणि क्षारांची कमतरता असल्यास त्यामुळे पचनकार्य सुरळीत होत नाही. त्यामुळेही शरीराला दुर्गंधी येण्याची शक्यता असते.

शरीरातून उद्भवणारी दुर्गंधी हटविण्यासाठी जीवनशैलीमध्ये काही मूलभूत परिवर्तन घडवून आणणे आवश्यक असते. यासाठी काही साध्या सवयींचा अवलंब आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करता येऊ शकेल. सर्वप्रथम जर घाम जास्त येत असेल, तर स्नानासाठी चांगल्या प्रतीच्या अँटी बॅक्टेरियल साबणाचा वापर करावा. उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा. त्याचप्रमाणे कपडे फार अंगाबरोबर किंवा घट्ट नसल्याची काळजी घ्यावी. स्नानासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये थोडेसे अॅपल सायडर व्हिनेगर घातल्याने हे मिश्रण देखील प्रतिजैविक म्हणून काम करते. सतत येणारा घाम टाळण्यासाठी अनेक जणांना अँटी पर्स्पायरंट्स वापरण्याची सवय असते. मात्र या प्रोडक्ट्सच्या परिणामस्वरूप शरीरातील घर्मग्रंथींमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याऐवजी तुरटीचा वापर करणे चांगले. घाम जास्त येत असल्यास वारंवार तेच ते कपडे न धुता वापरू नयेत. त्याचप्रमाणे रुमाल, पायमोजे, टॉवेल इत्यादी कपडेही दररोज धुतले जाणे आवश्यक आहे.

शरीराची दुर्गंधी हटविण्यासाठी आहारामध्येही काही बदल करता येतील. ज्यांना शरीराला दुर्गंधी येते अशा व्यक्तींनी आपल्या आहारातून रिफाइन्ड साखर असलेले पदार्थ, हायड्रोजनेटेड तेले कमी करावीत. तसेच ज्या व्यक्ती मांसाहारी असतील त्यांनी ‘रेड मीट’ ( बीफ, मटन इ. ) खाणे टाळावे. शरीराची पचनक्रिया सुरळीत नसल्यासही शरीरातून दुर्गंधी उद्भवू शकते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment