मनासारखी नोकरी आणि जोडीदार मिळण्यासाठी या मंदिरामध्ये पुरुषांसाठी आगळी परंपरा

job
आपले जीवन सर्वार्थाने सुखी व्हावे या उद्देशाने मनासारखी नोकरी मिळविण्यासाठी सर्वच जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. मनासारखी नोकरी आणि साजेशी जोडीदार मिळावी अशी प्रत्येक पुरुषाची इच्छा असणे स्वाभाविकच आहे. या दोन्ही इच्छा पूर्ण करणारे एक मंदिर भारतातील केरळ राज्यामध्ये आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये कोट्टनकुलांगारा या ठिकाणी श्रीदेवी मंदिर यासाठीच प्रसिद्ध आहे. मात्र या दोन्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी येथे येणाऱ्या पुरुषांना आगळ्या परंपरेचे पालन करावे लागते. या मंदिरामध्ये आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे मागणे देवापुढे मागण्यासाठी पुरुषांना स्त्रियांप्रमाणे सोळा शृंगार करावे लागतात.
job1
श्रीदेवी मंदिरामध्ये येणाऱ्या दर्शनार्थी पुरुषांना महिलांप्रमाणे आभूषणे लेऊन, प्रसाधन करावे लागते, आणि त्याचबरोबर महिला परिधान करीत असलेली पारंपारिक वेशभूषा देखील करावी लागते. महिलांप्रमाणे सोळा शृंगार करून जेव्हा पुरुष या मंदिरामध्ये उत्तम नोकरीसाठी आणि मनासारखी जोडीदार मिळावी अशी प्रार्थना करतात, तेव्हाच त्यांची मनोकामना पूर्ण होते अशी येथे मान्यता आहे. या परंपरेच्या मागेही मोठा रोचक इतिहास आहे. स्थानिक रहिवाश्यांच्या मान्यतेनुसार या मंदिरामध्ये असलेली देवीची मूर्ती स्वयंभू आहे. हे मंदिर उभे राहण्यापूर्वी येथे विस्तीर्ण कुरणे असून, धनगर त्यांच्या शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी येथे आणीत असत. या धनगरांना देवीची ही मूर्ती अकस्मात सापडल्यानंतर त्यांनी या मूर्तीला सोळा शृंगारांनी सजवून, साडी चोळी नेसवून साग्रसंगीत पूजा केली. ही देवी नवसाला पावणारी असून, त्यासाठी सोळा शृंगार करण्याची परंपरा तेव्हापासून रूढ झाल्याचे म्हटले जाते.
job2
दर वर्षी २३ आणि २४ मार्च रोजी या मंदिरामध्ये ‘चाम्याविलुक्कू’ नामक उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवाच्या वेळी पुरुष आपली मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करण्यासाठी स्त्री-वेषामध्ये या मंदिरामध्ये येतात. पुरुषांच्या जोडीने महिलांना देखील या उत्सवामध्ये सहभागी होता येते. ज्या प्रमाणे चांगला पती मिळावा या करिता महिला अनेक प्रकारची व्रत वैकल्ये करीत असतात, त्याचप्रमाणे देवीची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी पुरुष स्त्रीवेष परिधान करून, सोळा श्रुंगार लेऊन या मंदिरामध्ये येत असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment