पती-पत्नींनी देवीचे एकत्र दर्शन घेण्याला या मंदिरामध्ये मनाई


भारतातील अनेक मंदिरे त्यांच्या काही खास परंपरांच्या साठी ओळखली जातात. काही मंदिरांमध्ये महिलांचा प्रवेश निषिद्ध मनाला जातो, तर काही मंदिरांमध्ये पुरुषांचा प्रवेश निषिद्ध मानला गेला आहे. वास्तविक मंदिरामध्ये जाऊन पती-पत्नींनी एकत्र पूजा केली, तर ती पूजा सफल ठरत असल्याची मान्यता रूढ आहे, मात्र दुर्गा देवीचे एक मंदिर असेही आहे, जिथे पती-पत्नींना एकत्र मंदिरामध्ये जाऊन दर्शन करण्यावर बंदी आहे. या मंदिरामध्ये ही अजब परंपरा का अस्तित्वात आली असावी, याचे कारण भगवान शिवशंकरांशी निगडित आहे.

दुर्गा देवीचे हे मंदिर सिमला जवळील रामपूर गावामध्ये आहे. या मंदिरामध्ये पती-पत्नींनी एकत्र मंदिरामध्ये पूजा करणे, किंवा दुर्गादेवीचे दर्शन करणे सोडाच, तर एकत्र प्रवेश करण्यावरही बंदी आहे. हा नियम डावलून जर एखाद्या दाम्पत्याने एकत्र या मंदिरामध्ये प्रवेश केलाच, तर त्याची योग्य शिक्षा ही त्यांना देण्यात येत असल्याचे म्हटले जाते. दुर्गादेवीच्या या मंदिराला ‘श्राई कोटी माता मंदिर’ या नावाने ओळखले जाते. या मंदिराची ख्याती संपूर्ण हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये एखाद्या दाम्पत्याने एकत्र प्रवेश करण्यावर बंदी नसली, तरी मंदिरामध्ये एकत्र प्रवेश करण्यावर किंवा एकत्र दर्शन घेण्यावर मात्र बंदी आहे.

या मंदिराच्या अजब परंपरेच्या मागेही एक मान्यता रूढ आहे. या मान्यतेच्या अनुसार भगवान शिवाने आपले पुत्र गणपती आणि कार्तिकेय यांना ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून येण्यास सांगितले. कार्तिकेय त्वरेने आपले वाहन मोराला घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करण्यास निघून गेले, मात्र गणपती जागचे हालले नाहीत. माता-पित्यांच्या चरणांशीच सर्व ब्रह्मांड आहे असे म्हणत गणपतींनी शिव-पार्वतींना प्रदक्षिणा घातली. जेव्हा कार्तिकेय ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून परत आले, तेव्हा गणपती आधीच तिथे हजर असलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले. गणपतींनी प्रदक्षिणा पूर्ण केलीच नाही असे कार्तिकेयाने म्हटल्यावर शिवशंकरांनी गणपतीचे विधान सांगत गणपतीच्या बुद्धीची प्रशंसा करीत त्यांची प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचे सांगितले. यावर कार्तिकेय रुष्ट झाले.

गणपतीची बाजू घेऊन कार्तिकेयाला नाराज केल्याने पार्वतीही शंकरांवर नाराज झाली, आणि शंकरांसह पार्वतीची एकत्रित पूजा केली गेली, तर ती पूजा करणाऱ्या दाम्पत्याला विवाहसुख मिळणार नाही असा श्राप पार्वतीने दिला. पार्वती रूपी दुर्गा ‘श्राई कोटी माता मंदिरा’मध्ये अवतरली असून, तिच्या मंदिरामध्ये पती पत्नींनी एकत्र दर्शन केले, तर ते त्या दांपत्यासाठी अशुभ ठरते अशी मान्यता रूढ असल्याने या मंदिरामध्ये पती-पत्नी एकत्र दर्शनासाठी जात नाहीत.

Leave a Comment