भोपाल नजीकच्या किल्ल्यामध्ये आजही अस्तित्वात आहे पारस !


या जगामध्ये आज ही अनेक चमत्कारी वस्तू अस्तित्वात असल्याच्या अनेक कहाण्या, किस्से आपण ऐकत असतो, वाचत असतो. अशा चमत्कारी वस्तूंपैकी एक आहे ‘पारस’. लोखंडाचे रूपांतर सोन्यात करणारा असा हा पारस आहे. पारस अस्तित्वात असल्याच्या अनेक कथा जरी सर्वश्रुत असल्या तर हा पारस प्रत्यक्षात कोणी पाहिल्याचे मात्र ऐकिवात नाही. मात्र भारतामध्ये एका किल्ल्यामध्ये हा पारस अस्तित्वात असून, हा जमिनीमध्ये पुरलेला आहे असे म्हटले जात असल्याने दरवर्षी अनेक हौशी मंडळी या किल्ल्यामध्ये पारस शोधण्यासाठी येत असतात.

मध्य प्रदेशातील भोपाल पासून सुमारे चाळीस किलोमीटरच्या अंतरावर रायसेन नामक एक किल्ला आहे. हा किल्ला ज्या राजाच्या अधिपत्याखाली होता, त्या राजाच्या संग्रही पारस असल्याची आख्यायिका आहे. हा पारस मिळविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. हा पारस मिळविण्यासाठी अनेक धाडसी दरोडे या किल्ल्यावर घातले गेले, अनेक युद्धेही झाली. तेव्हा राजाने आपल्या संग्रही असलेला हा पारस इतर कोणाच्या हाती पडू नये यासाठी किल्ल्यामध्ये असलेल्या सरोवरामध्ये हा पारस टाकून दिला. आपण पारस सरोवरामध्ये टाकला आहे, याचा उल्लेख राजाने कोणापाशीही केला नाही. काही काळानंतर राजाचा अंत झाला, आणि राजा गेल्या नंतर शाही परिवारानेही अन्यत्र स्थलांतर केले. मात्र या परिवारापैकी पारसबद्दल कोणाला कसलीच माहिती नसल्याने राजाने सरोवरामध्ये टाकलेला पारस तिथेच राहून गेला.

कालांतराने सरोवरातील पाणीही सुकून गेले, पण सरोवराच्या तळाशी पारस सापडलाच नाही. हा किल्ला उजाड, वैराण झाल्यानंतरही अनेक राजांनी या किल्ल्यावर आपले सैन्य पाठवून त्यांच्या करवी पारस शोधण्याचे अनेक प्रयत्न केले, पण पारस कोणाच्याच हाती लागू शकला नाही. आजच्या काळामध्येही ज्यांना पारसबद्दलची आख्यायिका ठाऊक आहे, ती हौशी मंडळीही पारसच्या शोधार्थ रायसेनच्या किल्ल्यामध्ये येत असतात. मात्र पारस शोधण्याचे आजवरचे सर्वच प्रयत्न फोल ठरले आहेत.

पारस पत्थराचे रक्षण एक जिन्न करीत असल्याचे म्हटले जात असल्याने पारसच्या शोधार्थ आलेल्या अनेकांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याच्याही अनेक कथा येथे प्रचलित आहेत. पारसच्या शोधार्थ भारताच्या पुरातत्वखात्यानेही आजवर अनेक मिशन्स येथे पार पाडल्या असून, पारस किंवा पारसचे रक्षण करणारा रक्षकपुरुष अस्तित्वात असल्याचे कोणतेही पुरावे त्यांना आजवरच्या शोधांमध्ये सापडले नाहीत. पण तरीही हा पारस कधी ना कधी आपल्याला सापडेल या आशेपायी अनेक हौशी मंडळी आजही याच्या शोधार्थ येथे येत असतात.

Leave a Comment