ऐकावे ते नवलच !


ही घटना अमेरिकेतली असून, ‘बोस्टन ग्लोब’ या वृत्तपत्राने ही घटना प्रसिद्ध केली आहे. मॅसच्युसेट्स मधील मार्लबरो भागामध्ये राहणारा चव्वेचाळीस वर्षीय नेट रोमन नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळी आपल्या कामावरून घरी परतला. घरामध्ये पाऊल टाकता क्षणीच आपल्या घरामध्ये कोणी तरी असल्याची किंवा निदान कोणी तरी येऊन गेल्याची जाणीव नेटला झाली. नेटने तातडीने घरातील सर्व खोल्या आणि घराच्या आसपासचा परिसरही नजरेखालून घातला. घरामध्ये त्याच्याशिवाय इतर कोणीही नव्हते. त्याने घरातील सर्व कपाटे नजरेखाली घालून आपल्या मौल्यवान वस्तू चोरीला तर गेल्या नाहीत ना, याची खात्री करून घेतली. सर्व काही जागेवरच होते. आणि तरीही नेटला, त्याच्या घराचे एकंदर रूप बघून तिथे नक्की कोणी तरी येऊन गेले असल्याची खात्री होती. नेटला हा अनुभव अगदी नवीन होता, आणि त्यामुळे त्याने तातडीने पोलिसांना पाचारण केले.

नेटच्या घरी पोलीस दाखल झाले, आणि त्यांनी नेटचे म्हणणे ऐकून घेतले. नेटच्या घरामध्ये कोणी तरी येऊन गेल्याची खात्री पोलिसांनाही पटली. त्याला कारणही तसेच होते. नेट या घरामध्ये एकटाच रहात असल्याने घरामध्ये कायम कपडे आणि नेटच्या वस्तूंचा पसारा, फर्निचरवरची अनेक दिवस साठून राहिलेली धूळ, अस्ताव्यस्त पसरलेला त्याचा बिछाना आणि बेतास बात स्वच्छता असलेल्या घरातील बाथरूम्स अशी नेटच्या घराची सामान्य अवस्था असे. मात्र त्या दिवशी नेट कामावरून परतला आणि आपल्या घराची अवस्था पाहून आश्चर्याने थक्क झाला. नेटच्या घरातील सर्व सामान व्यवस्थित जागच्या जागी होते. स्वयंपाकघरापासून बाथरूम्सपर्यंत सर्व काही आरश्यासारखे लख्ख होते. जमिनीवर, फर्निचरवर नेहमी आढळणारी धूळ कुठेच दिसत नव्हती. आपले घर आवरून ठेवले कोणी, हे नेटला न उलगडणारे कोडे होऊन बसले.

नेटने सर्व हकीकत पोलिसांना कथन केल्यानंतर आपण कदाचित घराच्या परसदारातील दरवाजा आतून लावून घेण्यास विसरल्याने आगंतुक व्यक्ती त्या दरवाजाने आत आली असावी असे नेटने पोलिसांना सांगितले. आगंतुक व्यक्ती जरी घरामध्ये शिरली, तरी त्या व्यक्तीने आपल्या घराची इतकी स्वच्छता का करावी हे नेटच्या समजुतीच्या पलीकडले होते. आगंतुक व्यक्ती घरामध्ये शिरून तिने घर स्वच्छ केले हे पोलिसांसाठीही नवल असले, तरी मुळात कोणी अनोळखी व्यक्ती एखाद्याच्या घरामध्ये शिरणे हाच गुन्हा असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरविले.

चौकशीअंती जो खरा प्रकार उघडकीला आला, त्याने केवळ नेट आणि पोलिसांचे नाही, तर या बातमीचा पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचेच चांगलेच मनोरंजन झाले. घडले असे, की अमेरिकेमध्ये घरोघरी जाऊन सफाईची कामे करून देणाऱ्या अनेक ‘हाऊसकीपिंग एजन्सीज’ आहेत. या एजन्सीजचे कर्मचारी ग्राहकांच्या गरजेच्या अनुसार ग्राहकाच्या घरी येऊन घराची साफसफाई करून देत असतात. असेच एका ग्राहकाच्या घराच्या साफसफाईचे काम एका एजन्सीला दिले गेले असता, पत्ता चुकीचा दिला गेल्यामुळे कर्मचारी त्या ग्राहकाच्या घरी न पोहोचता नेटच्या घरी पोहोचले आणि घराची साफसफाई करून दिली. नेट दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्याने आपल्या घरामध्ये कोण आले याचा त्याला काहीच पत्ता नव्हता. मात्र पोलिसांनी या सर्व प्रकाराची उकल केल्यानंतर आता या रहस्यावर पडदा पडला आहे.

Leave a Comment