‘ अन्न हे पूर्णब्रह्म ‘


एका सर्वेक्षणाच्या अनुसार भारताची एकूण जनसंख्या जितकी आहे, तितक्या जनसंख्येला पुरून उरेल इतक्या अधिक प्रमाणामध्ये भोजन दररोज तयार केले जात असते. तरीही भारतामध्ये कुपोषित मुलांची संख्या लक्षणीय आहे. कृषी मंत्रालयाच्या अहवालाच्या अनुसार दर वर्षी खराब झालेले किंवा शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ टाकून देत असताना अशा रीतीने सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचे अन्न वाया जात असते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानल्या जाणाऱ्या भारत देशातील ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे.

‘भूक’ नामक एका एनजीओने दिलेल्या अहवालाच्या अनुसार भारतामध्ये दररोज सुमारे वीस कोटी लोकांवर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येत असते. तसेच दर वर्षी कुपोषणामुळे मरण पावणाऱ्या मुलांची संख्या सत्तर लाखांहूनही अधिक आहे. देशामधील एकूण पंचेचाळीस टक्के जमिनी भूजलाची पातळी खालाविल्याने उजाड होऊ लागल्या आहेत. वाढत्या जनसंख्येला अन्नपुरवठा करण्यासाठी अधिक धान्य उत्पादनाची आवश्यकता असल्याने जंगले तोडून त्या ठिकाणी शेतीसाठी जमिनी कसण्यात आल्या. परिणामी जंगले नाहीशी झाली, आणि पाण्याच्या अपव्ययाने भूजलाची पातळी खालावून जमिनी उजाड होऊ लागल्या. जी जंगले नाहीशी करून त्या ठिकाणी जमिनी कसून धान्य पिकविले जात आहे, त्या धान्यापासून बनविल्या जाणाऱ्या अन्नाची मात्र रोजच नासाडी होत आहे. अशा प्रकारे अन्न वाया घालविण्याची आपली सवय आपल्यासाठीच घातक ठरत आहे. केवळ अन्नपदार्थच नाही, तर ते बनविण्यासाठी लागणारे इंधन, पाणी यांचीही नासाडी पर्यायाने होतच आहे.

ही परिस्थिती बदलण्याचे उपायही आपल्याच हातात आहेत. महिन्याचे वाण सामान खरेदी करताना जितके आवश्यक आहे तितकेच खरेदी करावे. अनेकदा आपण हौशीने खरेदी केलेले अन्नपदार्थ आपल्या लक्षातही राहत नाहीत, आणि जेव्हा त्यांची आठवण होते, तोवर ते एक्स्पायर झालेले असतात. अशा वेळी ते अन्नपदार्थ टाकून देण्याखेरीज इतर कोणताच पर्याय उरत नाही. आठवड्याची भाजी खरेदी करताना त्यातील किती खरेच वापरली जाणार आहे, याचा विचार जरूर करावा. पालेभाज्या खरेदी केल्यास त्यांचा वापर लवकरात लवकर करावा. एकदा या भाज्या सुकल्या तर त्या वापरता येत नाहीत, आणि मग टाकूनच द्याव्या लागतात. दुपारी केलेल्या स्वयंपाकातील पदार्थ उरले, तर ते रात्रीच्या वेळी भोजनामध्ये घेता येतील असे पाहावे.

अनेक ऑफिसेसमध्ये कॅन्टीनची व्यवस्था असते. अशा कॅन्टीन्समध्येही दररोज बनविल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांतील किती तरी पदार्थ दिवसाखेर शिल्लक राहत असतात. अशा वेळी एखाद्या एनजीओच्या मदतीने हे अन्न गरजू लोकांना पुरविण्याच्या योजना सुरु करता येऊ शकतात. विवाहप्रसंगी किंवा घरी आयोजित केल्या गेलेल्या मेजवानीच्या प्रसंगीही अन्न शिल्लक राहिल्यास ते गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था नक्कीच केली जाऊ शकते.

जिथे अन्नाचा अपमान होतो, त्या ठिकाणी समृद्धी, संपन्नता, धनधान्य कधीच टिकून रहात नाही, ही शिकवण आपली संस्कृती आपल्याला फार प्राचीन काळापासून देत आली आहे. त्यामुळे अन्न तेवढेच शिजविले जावे, खरेदी केले जावे किंवा ताटामध्ये वाढून घेतले जावे, की ते टाकून देण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. भोजन खाण्यासाठी आहे, फेकण्यासाठी, टाकून देण्यासाठी नाही, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.

Leave a Comment